Mahayuti government nothing to do with ladki bahin, Vijay wadettiwar attacks : ९२ लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवून सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याची टीका
Nagpur “गरज सरो आणि वैद्य मरो… हेच सध्याच्या महायुती सरकारचे धोरण आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ज्या लाडक्या बहिणींना डोक्यावर घेतले, सत्ता मिळताच त्याच ९२ लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवून सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे,” असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती, जी कमालीची लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. लाडक्या बहिणींनी महायुतीला तारल्याचे दावे एकीकडे केले जात असतानाच, आता मात्र राजकीय स्वार्थ साधल्यामुळे वेगवेगळ्या निकषांचे कारण पुढे करून महिलांना अपात्र ठरवण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. सत्ता मिळवण्यासाठी आधी कोणतीही शहानिशा न करता सरसकट लाभ वाटण्यात आला, पण आता सत्ता हाती येताच महिलांना वाऱ्यावर सोडले जात आहे. महिलांच्या भावनांशी खेळ करून, त्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या या सरकारने नियोजनशून्य कारभाराचा आणि राजकीय स्वार्थाचा कळस गाठला आहे. ही योजना खरोखरच लाडक्या बहिणींसाठी होती की फक्त मतांसाठी? असा बोचरा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला असून, या चुकीच्या निकषांचा हिशोब कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
Vinayak raut : गिरीजा राऊत प्रकरणाला नवे वळण; ‘मोठे राजकीय षडयंत्र सुरू’
दरम्यान, राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर सरकारने बहिणींना दरमहा दोन हजार रुपयांचे वाटप सुरू ठेवले खरे, मात्र यामुळे आता राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडू लागला आहे. दुसरीकडे, सरकारी आणि निमसरकारी नोकरदार महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे पडताळणीत समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही पुरुषांनी तर चक्क नावे बदलून हे अनुदान लाटल्याचेही उघड झाले होते. तेव्हापासूनच या योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्याचे काम सरकारने हाती घेतले होते. मात्र, या छाटणीत आतापर्यंत तब्बल ९२ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्यामुळे नवा राजकीय वाद पेटला असून, विरोधकांनी सरकारला पुरते धारेवर धरले आहे.








