Organized extortion racket in the RTO department; ACB trap on officers who did not cooperate : IPS प्रियंका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Nagpur राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) एक अत्यंत धक्कादायक आणि संघटित भ्रष्टाचाराचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. पैशांची बेकायदेशीर वसुली करणाऱ्या या रॅकेटला सहकार्य न करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी चक्क ‘एसीबी’ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ट्रॅपचा हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ IPS अधिकारी प्रियंका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीची घोषणा केली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभेत प्रश्नोत्तर काळात वडेट्टीवार यांनी RTO मधील या ‘वसुली गँग’चा पर्दाफाश केला. नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांची बेकायदेशीर नोंदणी आणि कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी होत असल्याचे सांगत, या रॅकेटमध्ये गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ विदर्भातच ठाण मांडून बसलेल्या काही बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Devendra Fadanvis : “पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे” शिवानी कळमेकर प्रकरणात फडणवीसांची कबुली
त्यांनी थेट निवृत्त RTO अधिकारी बजरंग खरमाटे, अकोल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, अमरावतीचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक राजू नागरे, गोंदियाचे मोटार वाहन निरीक्षक आनंद मोड आणि खामगावचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक योगेश खेसनार यांची नावे सभागृहात वाचून दाखवली. हे सर्व अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुलीचे साम्राज्य चालवत असून, जे अधिकारी यांच्या वसुलीला नकार देतात त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी ट्रान्सपोर्टरमार्फत खोटे तक्रारदार उभे करून, नियोजनबद्ध पद्धतीने ACB चा ट्रॅप लावला जातो आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना अडकवून मानसिक त्रास दिला जातो, असे वडेट्टीवार म्हणाले. या संदर्भातील काही धक्कादायक ऑडिओ क्लिप्स देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्या.
महाराष्ट्राचा मोठा महसूल बुडत असल्याचा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वास्तव्य असूनही महागड्या आयातीत (Imported) वाहनांची नोंदणी इतर राज्यांत करून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केली जात आहे. या गंभीर आरोपानंतर सभागृहात प्रचंड खळबळ उडाली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असल्याचे स्पष्ट केले. IPS प्रियंका ननावरे यांच्या नेतृत्वाखालील ३ सदस्यीय समिती एका महिन्याच्या आत संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर करेल आणि वडेट्टीवार यांनी घेतलेल्या सर्व नावांची व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नसून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली. तसेच, परराज्यात वाहन नोंदणी करून कर बुडवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी नियम अधिक कडक केले जातील आणि वाहन नोंदणीच्या वेळी कर्ज, राहण्याचा पुरावा व GST पडताळणीची काटेकोर तपासणी केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. RTO विभागातील भ्रष्टाचाराचे हे संघटित रॅकेट मुळासकट उखडून टाकण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, या SIT चौकशीमुळे परिवहन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








