Vijay Wadettiwar alleges that the government is attempting to hand over 254 acres of government land in Mira-Bhayandar to builders : विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
Nagpur राज्यातील महायुती सरकार हे पूर्णतः बिल्डर धार्जिणे असून मिरा भाईंदर येथील सुमारे ६ हजार कोटी रुपये किमतीची २५४ एकर शासकीय जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला. मौजे भाईंदर येथील या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असून, मूळची सरकारी असलेली जमीन खासगी लोकांच्या फायद्यासाठी सोडण्यात प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली गेली, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
वडेट्टीवार म्हणाले की, ही जमीन मूळची राज्य शासनाची असताना शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महसूल अभिलेखात बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निकालात केंद्र सरकारचे अपील फेटाळून जमीन ‘मीरा सॉल्ट वर्क्स’च्या मालकीची असल्याचे मान्य केले. अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना मालकी हक्काचा निर्णय खासगी कंपनीच्या बाजूने लागणे, हे सरकारी वकील आणि विधी विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते. सरकारी वकील न्यायालयात नेमकी काय भूमिका मांडत होते की ते झोपले होते? अशी जळजळीत टीका वडेट्टीवार यांनी केली.
Buldhana health : बुलढाण्यात १४ रुग्णवाहिका बंद; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
एकीकडे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना दुसरीकडे सरकारी जमिनी बिल्डरांना बहाल केल्या जात आहेत. आता चौफेर टीका झाल्यावर सरकारला जाग आली असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची भाषा केली जात आहे. मात्र, उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत शासन काय करत होते? खासगी बिल्डरांचे हित जपण्यासाठीच ही कायदेशीर प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवली गेली का? असे सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले. ही जमीन जनतेची संपत्ती आहे आणि ती वाचवण्यासाठी सरकारने तत्परता दाखवली नाही, तर काँग्रेस पक्ष याविरोधात न्यायालयात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.








