congress may change nagpur ciry president, vikas thakre’s inning may end : ‘सृजन सप्ताहा’चा इफेक्ट; नव्या नेतृत्वासाठी काँग्रेसमधील गट-तट सक्रीय
Nagpur उपराजधानीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये तब्बल १३ वर्षांनंतर खांदेपालट होण्याचे संकेत मिळत असून, नव्या शहराध्यक्षाच्या शोधासाठी केंद्रीय निरीक्षकांचे पथक शनिवारपासून पाच दिवस नागपुरात मुक्कामाला येत आहे. आमदार विकास ठाकरे यांचा प्रदीर्घ कार्यकाळ आता संपण्याच्या मार्गावर असून, नव्या नेतृत्वासाठी शहरातील गट-तट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
आमदार विकास ठाकरे यांनी गेल्या १३ वर्षांपासून शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. या काळात राज्यात आणि केंद्रात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, प्रदेशाध्यक्ष बदलले, तरीही ठाकरे यांचे पद अढळ राहिले होते. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरू केलेल्या ‘सृजन सप्ताह’ अंतर्गत राज्यातील संघटनात्मक फेरबदलांचे वारे नागपुरातही पोहोचले आहेत. यासाठी काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, झिया पटेल आणि अशोक बोबडे या केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
हे निरीक्षक १० ते १५ एप्रिल या काळात नागपुरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधणार आहेत. या झाडाझडतीमुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी सध्या सक्रिय राजकारणातून काहीसे दूर आहेत, तर नितीन राऊत यांनी स्वतःला उत्तर नागपूरपुरते मर्यादित केले आहे. प्रफुल्ल गुडधे केंद्रात गेल्यामुळे आता शहराची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गिरीश पांडव, माजी आमदार अशोक धवड, विशाल मुत्तेमवार, संजय दुबे, अतुल कोटेचा, प्रशांत धवड आणि संदेश सिंगलकर यासारख्या डझनभर नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आल्याने आमदार अभिजित वंजारी यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.
निरीक्षकांचा हा ५ दिवसांचा दौरा १० एप्रिलपासून सुरू होईल. यामध्ये देवडिया काँग्रेस भवन आणि रवी भवन येथे विविध आघाड्या, सेल आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. १५ एप्रिल रोजी जिल्हाध्यक्षपदाच्या दावेदारांच्या मुलाखती झाल्यानंतर निरीक्षक आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करतील. त्यानंतरच नागपूर काँग्रेसचा नवा चेहरा कोण असेल, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.








