Breaking

Village development : भगत हेटी गावाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच विकास कामांना उभारी

Umred Tehsildars historic tour : उमरेड तहसीलदारांचा ऐतिहासिक दौरा:

Nagpur – Umred : स्वातंत्र्यानंतर प्रथमच उमरेड तहसीलदार भगत हेटी गावात पोहोचले. तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या या ऐतिहासिक दौऱ्याने विकासाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरु झाला आहे. जंगलात वसलेल्या, रस्तारहित आणि मूलभूत सुविधा नसलेल्या भगत हेटी गावात ‘प्रशासन’ प्रत्यक्ष पायवाटेने पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मनात आशेचा नवा किरण जागवला.

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या जनसंवाद कार्यक्रमात तहसीलदारांनी थेट गावात जाऊन नागरिकांच्या व्यथा ऐकल्या. मागण्या ऐकून, त्यांनी त्वरित उपाययोजना व अंमलबजावणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भगत हेटी मागासलेपणाचं जिवंत उदाहरण. उमरेड-नागपूर महामार्गापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आजवर केवळ नकाशावर होतं. रस्त्याअभावी तहसीलदारांना पायवाटेने गावात यावं लागलं.

CJI Bhushan Gavai : “सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा!”

गावात गोवारी समाजाची 17 कुटुंबं आणि शंभरहून अधिक लोकसंख्या राहते. पिण्याचे पाणी नाही, वीज नाही, शौचालय नाही, अंगणवाडी नाही, शाळा नाही अशा परिस्थितीत गावकरी जगतात. प्रशासनासमोर हे वास्तव मांडताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले, पण मनात आशाही निर्माण झाली. सध्या मांगली ग्रामपंचायतीअंतर्गत असलेला भगत हेटी महसुली गाव म्हणून नोंदलेला नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. ग्रामसभेने तहसीलदारांच्या उपस्थितीत ‘महसुली गावाचा दर्जा द्यावा’ असा ठराव मंजूर करून सादर केला. तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘लवकरच कार्यवाही होईल’ असं आश्वासन दिलं.

Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा

या दौऱ्यात नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी आणि अन्य 21 विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मांगली, पाचगाव व अन्य परिसरातील लोकप्रतिनिधीही कार्यक्रमात सहभागी झाले. गावकऱ्यांच्या प्रश्नांची नोंद घेत अनेक प्रकरणांवर त्वरित उपाययोजना सुरू करण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात तहसीलदार आले. त्यामुळे गावकऱ्यांचा उत्साह आणि समाधान दिसले. स्थानिक नेतृत्व आणि प्रशासनाच्या प्रयत्नांचं कौतुक होत आहे. भगत हेटी आता बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे. तहसीलदारांचा ऐतिहासिक दौरा केवळ एक कार्यक्रम नव्हता तो शासनाची जबाबदारी, आणि गावकऱ्यांच्या हक्कांचा पुनर्विचार होता.
या दौऱ्यामुळे गावाच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल, अशी ग्रामस्थांची आशा निर्माण झाली आहे.