sanjay-raut-saamana-editorial-uddhav-raj-thackeray-local-body-elections : निवडणुकांतील पराभवावर संजय राऊतांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा,
Mumbai: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असताना संजय राऊत यांनी ‘सामना’च्या संपादकीयमधून रोखठोक भाष्य करत विरोधकांसह ठाकरे बंधूंनाही थेट संदेश दिला आहे. विधानसभेनंतरही महाविकास आघाडीतील नैराश्य कायम असल्याचे नमूद करत, सत्ताधाऱ्यांना केवळ दोष देऊन चालणार नाही, तर तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्व उभे करावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
संपादकीयमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलेल्या सरशीचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष यांनी ‘बुथ’ पातळीवर मजबूत जाळे उभे केले, जेथे कार्यकर्ते नव्हते तेथे इतर पक्षांतील प्रभावी व्यक्तींना आपल्या बाजूला वळवले, असा उल्लेख राऊतांनी केला आहे. निवडणुका जिंकताना भाजप कोणतेही सोवळे पाळत नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचे बारकाईने विश्लेषण केले.
NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत हालचालींना वेग!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत ग्रामीण भागात दौरे केले, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते, असे निरीक्षण राऊतांनी नोंदवले. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाला १६२ जागा मिळाल्या, रत्नागिरी व रायगड येथे सत्ता मिळाली, तर सिंधुदुर्गमध्ये भाजपने बाजी मारली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेसविषयी भाष्य करताना राऊतांनी शरद पवार गट विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडल्याचे म्हटले. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे त्यांच्या पक्षाला १६५ जागा मिळाल्याचा उल्लेख करत, या घटकाचा परिणाम नाकारता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेच्या पिछेहाटीवर भाष्य करताना राऊतांनी ती महाराष्ट्राच्या राजकीय समतोलासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले. शिंदे यांचे नेतृत्व ठाकरे यांच्यापेक्षा मोठे नसतानाही प्रत्येक निवडणुकीत ते आघाडी घेतात, हे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याचे कारण असल्याचे त्यांनी सुचवले. सत्ताधाऱ्यांवर टीका करणे सोपे आहे; मात्र प्रभावी नेतृत्व उभे न केल्यास पराभव टाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Bjp training campaign : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’चा ठाम संदेश !
याच पार्श्वभूमीवर राऊतांनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव घेत, स्थानिक स्वराज्य निवडणुकांत त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकाल वेगळे लागले असते, असा टोला लगावला. मोदी-शहा-फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे व्यापारीकरण केले, ही टीका मान्य करतानाही लोकभावनेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संपादकीयातील या जळजळीत विश्लेषणामुळे महाविकास आघाडीत आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित झाली असून, आगामी महापालिका व स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती काय असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








