Acceptance of questions started sessopm will from December 8 : तारांकित प्रश्न स्वीकारण्याला झाली सुरूवात
Nagpur : राज्याची उपराजधानी नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात येत आहे. येत्या ८ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याचे सचिवालयाकडून सांगण्यात येत असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार ही तारीख काहीशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनाच्या पार्श्र्वभूमीवर मंत्रालयीन विभागांनी तारांकित प्रश्न स्वीकारण्याला सुरूवात केली आहे. ठेकेदारांनी काम बंद केले असले तरी सचिवालयाच्या कामकाजाची गती वाढताना दिसते आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमधून विधिमंडळ सदस्यांकडून विचारल्या जाणाऱ्या तारांकित प्रश्र्नांच्या स्वीकृती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. नागपुरात होणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्र्नांवर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटदारांच्या आंदोलनांमुळे काही कामकाजांवर परिणाम झाला आहे. असे असले तरीही कायदे व नियमांच्या प्रक्रियांचे चाक थांबलेले नाही, असे सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपुरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन घेतले जाते. १९६० मधील नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात होणे बंधनकारक आहे. हीच परंपरा अजूनही कायम आहे. यावर्षीच्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील चर्चा रंगण्याची शक्यता आहे. अधिवेशनासाठी सचिवालय आणि संबंधित विभागांची तयारी जोमाने सुरू आहे.
सुरक्षा, वाहतूक नियोजन, पार्किंग, निवास व्यवस्थेची कामे पूर्णत्वास येत आहेत. मात्र कंत्राटदारांच्या संपामुळे काही इमारतविषयक आणि दुरूस्तीची कामे रखडली आहेत. पण त्यावरही प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकाररकडून अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेचा अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा उत्साह आणि प्रशासकीय हालचाली दोन्ही जोमात सुरू आहेत.








