melghat-katkumbh-sarpanch-lalita-bethekar-development-story : प्रशासकीय पारदर्शकतेचा नवा आदर्श, ललिता बेठेकर यांच्यामुळे विकासाची नवी ओळख
Amravati सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या आणि दाट जंगलांनी व्यापलेल्या मेळघाट परिसरात कुपोषण, अंधश्रद्धा, माता-बाल मृत्यू तसेच रोजगारासाठी स्थलांतर यांसारख्या गंभीर समस्या दीर्घकाळापासून आहेत. मात्र या दुर्गम भागात आता बदलाची नवी चाहूल लागली आहे. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता बेठेकर या आपल्या जिद्द, शिक्षण आणि प्रामाणिक कार्याच्या जोरावर गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. महानगरातील प्रगती पाहताना मेळघाट अद्याप मागास का राहिला, हा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विचारातून समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ग्रामपंचायत राजकारणात प्रवेश केला. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत प्रथम उपसरपंच आणि नंतर सरपंच म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.
Women’s day : महिला बचतगटांना मोठा दिलासा : अमरावतीत १,५०० गटांना प्रत्येकी १ लाख अनुदान
साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या ललिता बेठेकर यांनी समाजकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे. मागील कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने काम करून ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या जोरावर सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवत त्यांनी पुरुष उमेदवारांनाही मागे टाकत सरपंचपद मिळवले.
ग्रामपंचायतीतील दलाली आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. विहिरी, घरकुल आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैसे देण्याची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच गावातील अतिक्रमण हटवणे, दुकानांची योग्य व्यवस्था करणे आणि दारूबंदीबाबत जनजागृती करणे अशी अनेक कामे त्यांनी हाती घेतली.
Shivsena UBT : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा कट?, परिसरात संशयास्पद हालचाली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरी, गोठे आणि इतर कामे उपलब्ध करून देत गावातील अनेकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत काटकुंभ गावाला तालुक्यात अव्वल स्थान मिळाले असून विविध समाजघटकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
काटकुंभ ग्रामपंचायतीच्या इतिहासात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिला आहे. बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देणे, महिलांना लघुउद्योगासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
Ajit Pawar death : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात, सत्य लवकरच बाहेर येईल
मेळघाटातील कुपोषण आणि माता-बाल मृत्यू कमी करण्यासाठी गावात आरोग्य शिबिरे, रक्त तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तदाब व शुगर तपासणी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांना आणि मुलांना योग्य पोषण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत.
ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित करण्याचा प्रयत्न, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्मशानभूमीचा विकास, शाळा व रुग्णालय परिसराचे नियोजन आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवणे अशी विविध विकासकामे सुरू आहेत. भविष्यात मोठ्या पातळीवर काम करण्याची तयारीही ललिता बेठेकर करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही त्या सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
मेळघाटसारख्या दुर्गम भागात एक तरुण महिला सरपंच आपल्या जिद्दीच्या बळावर गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ललिता बेठेकर यांचे कार्य केवळ काटकुंभ गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मेळघाटातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








