२०८ उमेदवार मैदानात, हायकोर्टाच्या निकालाकडे लक्ष
Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. २५ जागांसाठी तब्बल २१० नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी केवळ दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सध्या २०८ नामांकन कायम आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून, त्यानंतरच प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
घाटंजी तालुका गटातून अनंत कौतुकराव गाडगे, तर कळंब तालुका गटातून अरुण पंढरीनाथ राऊत यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तालुका गटातील १६ जागांसाठी असलेल्या ६५ उमेदवारांपैकी आता ६३ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, बँकेच्या जिल्हा गटातील नऊ जागांसाठी ११७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. यामध्ये महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी २८, राखीव तीन जागांसाठी ४८, तर इतर संस्था मतदारसंघातील चार जागांसाठी ४१ उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे माघारीच्या अखेरच्या टप्प्यात कोण कोण माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांचा आक्रोश अन् मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
तालुका गटात काही उमेदवारांनी प्रचाराची प्रत्यक्ष सुरुवात केली असली तरी जिल्हा व राखीव गटातील अनेक इच्छुक अद्याप भेटीगाठी आणि मतदारांशी संपर्कावर भर देत आहेत. काही उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध नियोजन सुरू केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संभाव्य आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणत्या पॅनलकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता कायम आहे.
बंडखोरीची शक्यता लक्षात घेता प्रमुख राजकीय गटांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. अनेक जागांसाठी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी जाहीर केल्यानंतर निर्माण होणारी नाराजी आणि संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी माघारीनंतरच पॅनलची घोषणा करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जिल्हा गटातील इतर संस्था मतदारसंघातील चार जागांच्या निवडणुकीवर उच्च न्यायालयातील याचिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या निकालानंतर या चार जागांची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार होणार की त्यामध्ये बदल होणार, हे स्पष्ट होणार आहे. काही माजी संचालकांच्या पात्रतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असल्याने न्यायालयीन निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
पत्र लिहिले, फोन केला, स्वीय सहायकाला भेटीला पाठवले; पाठपुराव्याचा ‘मुनगंटीवार पॅटर्न’ पुन्हा यशस्वी
त्यामुळे ३० सप्टेंबरनंतर उमेदवारी माघारीचे चित्र, त्यानंतर होणारी पॅनलची घोषणा आणि उच्च न्यायालयाचा निर्णय या तीन घडामोडींवर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. लवकरच निवडणुकीतील खरी रणधुमाळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.








