व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांचा आक्रोश अन् मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांचा आक्रोश अन् मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरीच्या शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा पाठपुरावा

Mumbai शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात केवळ त्यांच्या पाठीशी उभे राहणे नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांचा शासनस्तरावर आग्रही पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील भूमिका आज पुन्हा अधोरेखित झाली. बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने या तालुक्यांतील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली. त्याची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळग्रस्तांना मदतीचे निर्देश फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे अनिश्चित व असमान प्रमाण, पिकांची चिंताजनक अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांवर वाढत असलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, यासाठी त्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात तीनही तालुक्यांतील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी केली. केवळ पूर्वनिश्चित निकष किंवा उपलब्ध आकडेवारीवर निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी आ.मुनगंटीवार यांनी भूमिका मांडली.

पत्र लिहिले, फोन केला, स्वीय सहायकाला भेटीला पाठवले; पाठपुराव्याचा ‘मुनगंटीवार पॅटर्न’ पुन्हा यशस्वी

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत ग्राऊंड ट्रुथिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थिती तपासणे, नव्या पीक पाहणी पद्धतीतून पिकांची स्थिती जाणून घेणे आणि आवश्यक ते पंचनामे करून वस्तुस्थिती निश्चित करणे, यावर भर दिला. त्यानुसार दुष्काळाची प्रत्यक्ष झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाला देण्यात आले आहेत. यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशाचा मार्ग प्रत्यक्ष परिस्थितीच्या नव्याने होणाऱ्या पडताळणीसाठी खुला झाला आहे. दुष्काळाची तीव्रता आणि पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यांतून स्पष्ट झाल्यानंतर त्याआधारे पुढील आवश्यक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत, वीजजोडणी खंडित न करणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत, पाणीपुरवठा तसेच पीक नुकसानीनुसार मदत व नुकसानभरपाई यांसह शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यांच्या आधारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळीच दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्याच्या शेतात संकट किती आहे, हे कागदावरील आकडेवारीपेक्षा त्याच्या बांधावर जाऊनच समजू शकते. त्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांना केवळ यादीतून वगळले गेले म्हणून दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. ग्राऊंड ट्रुथिंग, पीक पाहणी आणि पंचनाम्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर यावी आणि दुष्काळाची झळ पोहोचलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मदत मिळावी, हीच आपली भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार,असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘मला आता राजकारणात रस नाही’; शिंगणेंच्या विधानाने राजकारणात खळबळ

बळीराजाच्या संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे, त्याचा आवाज शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचवणे आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे त्याला न्याय मिळवून देणे, या भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांच्या आशेला आता नवी दिशा मिळाली आहे.

error: Content is protected !!