व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शेतकऱ्यांना आधी सक्षम करा, मग विकासाच्या गप्पा मारा! विद्या चव्हाण यांचा सरकारवर...

शेतकऱ्यांना आधी सक्षम करा, मग विकासाच्या गप्पा मारा! विद्या चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाचा महिलांवरही गंभीर परिणाम; राष्ट्रवादी महिला आघाडीचा राज्यव्यापी जनसंवाद

Yavatmal : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या वाढत्या समस्यांवरून माजी आमदार विद्या चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी शेतकऱ्यांना सक्षम करा, मग विकास करा,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना, दुष्काळी मदत आणि पीकविम्याचा लाभ वेळेत मिळत नसताना विकासाच्या मोठ्या घोषणा कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने राज्यभर ‘दुष्काळ आणि महिलांचे प्रश्न : महिलांशी जनसंवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या अभियानातून दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. प्रत्येक तालुक्यातील पाच गावांमध्ये प्रत्येकी २० महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी नोंदविण्यात येत आहेत. या समस्यांवर आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीकडून सांगण्यात आले. यवतमाळ येथे जनसंवाद कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

सत्तेसाठी राजकीय धडपड, पण ‘वसंत’ सुरू करण्यासाठी पुढाकार कधी?

दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून त्याची सर्वाधिक झळ कुटुंबातील महिलांना बसत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. रोजगाराच्या संधी कमी झाल्याने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर परिणाम होत असून मुलींच्या शिक्षणात खंड पडण्याची आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची समस्या गंभीर बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचा आणि शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. दिवाळीसारख्या सणाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांच्या अडचणी कशा सुटणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“शेतकरी अन्नधान्य पिकवतो, संकटात सापडतोही शेतकरी; मात्र कमाई दलाल करतात. हा कुठला न्याय?” अशा शब्दांत त्यांनी शेतमालाच्या दरांवरून सरकारला लक्ष्य केले. उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकार पुढाकार घेते; मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी तितकीच इच्छाशक्ती दाखवली जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. शक्तिपीठ महामार्ग आणि कुंभमेळ्यासारख्या मोठ्या प्रकल्पांवरील खर्चाचा उल्लेख करताना, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पोस्ट टाकण्यासाठी ५०० रुपये मिळत होते, डिलीट करण्यासाठीही मिळतात का? सुजात आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

या वेळी जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, डॉ. आशा मिरगे, सोनाली देशमुख, अंजली साळवे, मनीषा काटे, भावना लेडे, लीना तुरकर, ज्योती येवले यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तसेच जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, प्रदीप पाटील आणि स्वप्नील कनवळे यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

error: Content is protected !!