Zilla Parishad Elections : ‘झेडपी’तील काँग्रेस-भाजप लढतीचा समतोल ढासळणार? राष्ट्रवादी-सेनेची वाढती ताकद ठरणार किंगमेकर!

Growing strength of NCP–Shivsena likely to play kingmaker : पालिका निवडणुकांचा प्रभाव; मिनी मंत्रालयातही बहुरंगी राजकारणाची चिन्हे

Buldhana कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांत महायुतीतील पक्षांनीच एकमेकांविरोधात ताकद आजमावली. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांची चर्चा मर्यादित राहिली. मात्र आता जिल्हा परिषद व पंचायत समिती या तथाकथित ‘मिनी मंत्रालय’च्या रणांगणात पुन्हा एकदा वेगळे राजकीय समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कार्यकर्त्यांची बंडाळी टाळण्यासाठी सत्तेतील सहभागी पक्ष परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील पारंपरिक काँग्रेस विरुद्ध भाजप या लढतीचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट हा ‘बॅलन्स’ बदलू शकतात. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणूक निकालांवर नजर टाकली असता ही बाब अधोरेखित होते.

Mahayuti Government : थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना ‘डबल पॉवर’; सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश

पालिका निकालांवरून पाहता, दोन्ही शिवसेना गट एकत्र येण्याची शक्यता कमी असली तरी त्यांच्या एकत्रित ताकदीत वाढ झालेली दिसते. २०१७ मध्ये एकसंघ शिवसेनेचे ४९ नगरसेवक होते. २०२५ मध्ये शिंदेसेनेचे ४६ आणि उद्धवसेनेचे १० असे मिळून ही संख्या ५६ वर पोहोचते. त्याचप्रमाणे, २०१७ मध्ये एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ नगरसेवक होते; २०२५ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) २६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १३ असे एकूण ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. (यामध्ये संग्रामपूर व मोताळा नगरपंचायतींचा समावेश नाही.)

हे चित्र लक्षात घेतल्यास, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत हे चारही घटक काँग्रेस किंवा भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यात अडथळा ठरू शकतात. परिणामी, भाजपचे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविण्याचे स्वप्न धोक्यात येऊ शकते, तर स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसचा समजला जाणारा मिनी मंत्रालयातील बालेकिल्लाही हादरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MSRTC : प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एसटी महामंडळाचा थेट संवाद

सध्या या पक्षांमध्ये कोणतीही अधिकृत युती किंवा आघाडीची चर्चा सुरू नसली, तरी पालिका निवडणुकांप्रमाणेच शेवटच्या क्षणापर्यंत भूमिका गुप्त ठेवण्याची रणनीती अवलंबली जाऊ शकते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्ते मात्र ताकदीने मैदानात उतरायच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनीही ‘जर-तर’चा विचार करून आतापासूनच आपापली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
चिखली, बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, लोणार, नांदुरा, मलकापूर व सिंदखेड राजा या तालुक्यांतील ग्रामीण भागात एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही ठोस पॉकेट्स आहेत. या भागांवर लक्ष केंद्रित करत दोन्ही सेना व राष्ट्रवादी काँग्रेस आगामी मिनी मंत्रालयाच्या लढतीत निर्णायक भूमिका बजावू शकतात.