
minor-child-voting-villas-bhumre-controversy : पाचोड येथील मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार; ईव्हीएमजवळ मुलाला नेल्याचा व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या मतदानादरम्यान पाचोड (ता. पैठण) येथील एका केंद्रावर लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केलाच, पण ईव्हीएम यंत्राचे बटणही मुलाकडून दाबून घेतल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार विलास भुमरे आपल्या लहान मुलासह मतदान केंद्राच्या ‘क्युबिकल’मध्ये (ईव्हीएम यंत्राजवळ) दिसत आहेत. मतदानाची गुप्तता पाळणे बंधनकारक असताना, आमदारांनी मुलाला थेट यंत्राजवळ नेले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मुलाचे वय मतदानासाठी पात्र नाही, त्या मुलाच्या बोटाला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अधिकृत शाईदेखील लावली आहे.
हा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उघड उल्लंघन असून, आमदारांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा निवडणूक प्रशासनाने चौकशीचे चक्र फिरवले आहे.
मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष, शाई लावणारे कर्मचारी आणि तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. “निवडणूक प्रक्रियेत कोणताही नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, प्राथमिक अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफीचा ‘अंतिम’ टप्पा: कृषीमंत्र्यांचे संकेत आणि अंमलबजावणीतील आव्हाने
मतदान केंद्र ही अत्यंत संवेदनशील जागा असते, तिथे अधिकृत मतदाराव्यतिरिक्त कोणालाही (विशेषतः ईव्हीएमजवळ) प्रवेश दिला जात नाही. मात्र, एका लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारे नियमांची पायमल्ली केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ईव्हीएमचे बटण दाबण्यासारखी कृती लहान मुलाकडून करून घेणे, हे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे.








