Black magic materials dumped outside former MLA’s house : बंगाली भोंदू बाबाच्या कृतीने सांगलीत खळबळ, नागरिकांनी चोपले
Sangli 0: नगर पालिका, नगर पंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढलेला असतानाच सांगली जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला असून, ऐन निवडणुकीत काळी जादू आणि भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळ्या जादूसाठी वापरण्यात येणारे साहित्य टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने स्थानिक व्यक्तीच्या मदतीने हे साहित्य टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट झाले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
Latur Political Analysis : औशाच्या रणांगणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; भाजपची रणनीती यशस्वी?
घटनेनंतर माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ हालचाली करत भानामती करणाऱ्या बंगाली भोंदू बाबासह त्याला मदत करणाऱ्या स्थानिक व्यक्तीचा शोध घेतला. दोघांनाही पकडून नागरिकांनी बेदम चोप दिला आणि त्यांची शहरातून धिंड काढत अखेर विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी आमदाराच्या घरासमोर असा अंधश्रद्धेचा प्रकार करण्यात आल्याने विटा शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणी विटा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोघांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर
दरम्यान, या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही. नागरिकांनी अशा प्रकारांना घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने तक्रार करावी आणि अशा प्रवृत्तींचा ठामपणे निषेध करावा. दरम्यान या घटनेमुळे निवडणूक काळात अंधश्रद्धा आणि काळी जादूविरोधात अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.








