Ajit Pawar clear statement, serious allegations on administration : अजित पवारांचा स्पष्ट खुलासा, कारभारावर गंभीर आरोप
Pimpri-Chinchwad : महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने करत असलेल्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आरोपांना प्रत्युत्तर दिले जात असले तरी मुख्यमंत्री स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
गुरुवारी पिंपरी येथे अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या महापालिका कारभारावर तीव्र टीका केली. गेल्या नऊ वर्षांत महापालिकेत विचित्र आणि संशयास्पद कारभार झाला असून चुकीच्या कमिशनसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उभे राहून त्यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडतात, त्यामुळे अधिकारी घाबरले असून अनेकजण स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारत आहेत, असे ते म्हणाले. शहर अभियंत्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याचे उदाहरण देत, हजारो कोटींचे मालक झालेले लोक नेमका कोणता व्यवसाय करतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी नगरसेवकांवरही अजित पवार यांनी भाष्य केले. आर्थिक अडचणी असल्याचे कारण देत आम्ही कामे देतो, असे आमिष दाखवून भाजपने त्यांना पक्षात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने उमेदवारी दिलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीतून गेलेले माजी नगरसेवक असल्याने भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचाही दावा त्यांनी केला.
भाजपवरील आरोपांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रत्युत्तर दिले असले तरी ‘सुपारीबाजां’कडे आपण लक्ष देत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महापालिकेतील भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुरेसा विरोध केला नाही, हेही त्यांनी मान्य केले. नेता एकटाच लढत असतो, ठरावीक लोक काम करतात आणि उरलेले फक्त पाठिशी उभे राहतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जनतेने माझ्याकडे बघून नगरसेवक निवडून द्यावेत, असे आवाहन करत दर आठवड्याला शहरात येऊन काम पाहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास टँकर माफिया बंद केला जाईल आणि दररोज पाणीपुरवठा केला जाईल. पाणी वितरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या जवळ असलेल्या पुराव्यांच्या आधारे महापालिकेतील चुकीच्या कामांची चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले असून, सूर जुळले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलगा पार्थ पवार आणि जय पवार महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दिसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Bmc election : राहुल नार्वेकरांवर धमकीचे आरोप; ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद,
कोरेगाव (मुंढवा) जमीन प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, पार्थ पवार यांच्या नावापुढे ‘अजित’ हे नाव असल्यामुळेच हे प्रकरण उचलण्यात आले. मात्र त्या जमिनीचे खरेदीखत होऊच शकत नाही आणि चौकशी सुरू असून दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








