ncp-national-executive-list-sunetra-parth-jay-pawar-financial-control-political-news : सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांकडे आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे
Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली यादी आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या यादीत पक्षाच्या आर्थिक व्यवहारांपासून ते महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांपर्यंत अनेक अधिकार थेट पवार कुटुंबीयांकडे केंद्रीत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक नियंत्रण पूर्णतः पवार कुटुंबीयांच्या हाती गेल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याचे या यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. पार्थ पवार यांची राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पक्ष समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदासह राष्ट्रीय शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या खजिनदाराची भूमिकादेखील जय पवार यांच्याकडेच सोपवण्यात आल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे.
Sanjay Kute : डॉ. संजय कुटेंना ‘नवीन जबाबदारी’ देऊन नाराजी संपवली?
या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत आर्थिक व्यवहारांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, राष्ट्रीय महासचिव व कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार म्हणून वाय. पी. त्रिवेदी यांची संयुक्त स्वाक्षरी आवश्यक होती. पक्षाच्या बँक व्यवहारांसह निधी जमा करणे किंवा निधी काढण्याचे अधिकार या तिघांकडे होते.
मात्र नव्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांचा राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमधून त्यांची भूमिका जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. आता पक्षाच्या अधिकृत आर्थिक व्यवहारांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार आणि खजिनदार म्हणून जय पवार यांच्याकडेच प्रमुख अधिकार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Devendra fadnavis : “पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा सहन केली जाणार नाही”
दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र त्यानंतरही अद्याप सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली 29 एप्रिलची यादीच अधिकृत मानली जात असून त्यानुसारच जबाबदाऱ्यांचे वाटप कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि आर्थिक नियंत्रणाचा केंद्रबिंदू पूर्णपणे पवार कुटुंबीयांच्या भोवती फिरत असल्याची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या नव्या सत्ताकेंद्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








