डब्यात टाकताना फाटलेल्या मतपत्रिका बाद ठरवू नये, निवडणूक आयोगाकडे मागणी
Chandrapur नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिक उमेदवार रिंगणात असल्याने मतपत्रिका मोठी झाली आहे. ही मतपत्रिका घडी घालून मतपेटीतील लहान छिद्रातून टाकताना मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असून, मतपत्रिका फाटण्याची शक्यताही वाढली आहे. या तांत्रिक अडचणींकडे निवडणूक आयोगाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रपूर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मतदान करण्यासाठी काही सेकंद पुरेसे असले, तरी मोठी मतपत्रिका व्यवस्थित घडी घालून मतपेटीत टाकण्यासाठी अनेक मिनिटे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रक्रियेत मतपत्रिका फाटल्यास संबंधित मत बाद ठरण्याची भीती असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने कराळे मास्तर संतप्त
मतपत्रिका मतपेटीत टाकताना ती फाटण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मुनगंटीवार यांची मागणी आहे. केवळ मतपेटीत टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान मतपत्रिका फाटली म्हणून पदवीधर मतदाराचे मत बाद ठरवू नये, असे त्यांनी म्हटले.
निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेतील तांत्रिक बाबींची योग्य तपासणी का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाकडून काटेकोर दक्षता घेतली जाते; मात्र प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांना आवश्यक सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील विविध भागांत मतपत्रिका हाताळताना येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी समोर येत असल्याचे सांगून, निवडणूक आयोगाने या समस्येची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना अडथळे येऊ नयेत आणि तांत्रिक कारणांमुळे मत बाद होण्याची भीती राहू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि मतदारांच्या दृष्टीने अडचणमुक्त असावी, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पदवीधर मतदारसंघातील मतदानादरम्यान निर्माण झालेल्या या प्रश्नावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.








