Will Raj – Uddhav Thackeray come together? Will Maharashtra politics change : मराठी माणसाचं नुकसान करणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही
Mumbai : शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. तेव्हापासूनच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का, हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना पडलेला प्रश्न.. आता या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. ‘महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ वाद बाजुला ठेवायला तयार आहे..’, असे आता दोघेही भाऊ बोलायला लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे एकत्र येतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. दोन भावांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातील राजकारण बदलेल, असाही एक मतप्रवाह आहे. यासंदर्भात शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (१९ एप्रिल) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले, त्यातून मार्ग जरी वेगळे झाले असले तरी उद्धव ठाकरेंचा मार्ग हा महाराष्ट्र हिताचाच आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी वाद मिटवायला तयार आहेत. आमच्यात वाद आणि भांडण नाहीच. अन् असली तरी ती मिटवायाला वेळ लागत नाही. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या ज्या फौजा आहेत, त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये. भाजपसोबत २५ वर्ष आमची युती होती. त्या युतीमध्ये राज ठाकरेसुद्धा सहभागी होते. शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला बाजुला व्हावे लागले, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !
महाराष्ट्रद्रोहींना मदत करणाऱ्यांसोबत त्यांनी राहू नये, ही आमची अट नाही, तर भावना आहे. ही तमाम महाराष्ट्रातील मराठी मनांतील भावना आहे. त्यांनी काळे कायदे केले, उद्योग महाराष्ट्राबाहेर घालवले आणि अनेक महाराष्ट्रद्रोही कृत्य केले. अशा शक्तींबरोबर राहणे योग्य नाही. अन् ते राज्याला परवडणारं नाही, ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट आणि नम्रपणे सांगितलं आहे की, आजही अशा काही शक्ती आहेत की, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान करण्यासाठी कारस्थान करणाऱ्यांच्या पंक्तीला आम्ही बसणार नाही, त्यांना घरातही घेणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि अशी भूमिका सगळ्यांनी घेणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.








