Bharati announces Atul Deshmukh’s candidature for graduate constituency : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूक, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला दिला होता पाठिंबा
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, ‘शिक्षक भारती’ संघटनेतर्फे अतुल देशमुख यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार कपिल पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली असून, शैक्षणिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
या घोषणेमुळे नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत पसरलेल्या या मतदारसंघात राजकीय चलबिचल वाढली असून, विद्यमान काँग्रेस आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि भाजपचे संभाव्य उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात त्यांची थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीत शिक्षक भारतीच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेत ॲड. अभिजित वंजारी यांना पाठिंबा जाहीर केला होता.
तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी भाजपने नागपूरचे माजी महापौर अनिल सोले यांचे तिकीट कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक तथा माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. अनिल सोले हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने, त्यांचे तिकीट कापल्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. या पक्षांतर्गत असंतोषाचा आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांचा मोठा फायदा घेत अभिजित वंजारी यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
Brij bhushan singh : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह निर्दोष मुक्त!
मागील निवडणुकीच्या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्याचा लाभ ॲड. वंजारी यांना मिळाला होता, मात्र सध्या राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली असून महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांची पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कोहळे हेच भाजपचे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. असे असतानाच, शिक्षक भारतीकडून अतुल देशमुख यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने या लढतीत मोठा ट्विस्ट आला आहे. एकेकाळी भाजपच्या हातात असलेला हा प्रतिष्ठित मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्याचे मोठे आव्हान आता महायुतीपुढे असणार असून, या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.








