Chief Minister Fadnavis direct warning to controversial ministers : मुख्यमंत्री फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना थेट इशारा
Mumbai : राज्यातील काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त कृत्यांमुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम सुटला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी नंतर झालेल्या चर्चेत फडणवीसांनी थेट सर्व मंत्र्यांना कानउघाडणी केली असून, आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही, असा ठणकावून इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये वादग्रस्त घटनांची मालिकाच सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील पैशांनी भरलेली बॅग असलेला व्हिडिओ चर्चेत असतानाच, अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळताना दिसले. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं असून, वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.
Devendra Fadnavis : निवडणुका महायुतीतच पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या !
याच पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना जाहीर इशारा दिला. वादग्रस्त विधाने, कृती आणि गैरवर्तन यापुढे सहन केलं जाणार नाही. यामुळे सरकारची बदनामी होते, आणि जनता असं वागणं माफ करत नाही. ही तुमची अखेरची संधी आहे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मंत्र्यांना समाजाचे समोरीत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ हे राज्याच्या विकासाचा आणि कायद्याच्या निर्णयांचं प्रमुख केंद्र असताना त्याच सभागृहात रमीसारखा जुगार खेळल्याचे चित्र कोकाटेंमुळे समोर आले. त्यानंतरही कोकाटेंनी ‘राज्य सरकार भिकारी आहे’ असं विधान करून परिस्थिती आणखी चिघळवली. दुसरीकडे, शिरसाट यांच्या प्रकरणाने सरकारची विश्वासार्हता डागळली.
मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं स्पष्टपणे जाणवलं आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना सांगितलं की, यापुढे अशा प्रकारांचा पुनरावृत्ती झाली, तर थेट कारवाई होईल. सरकारची बदनामी करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.सत्तेच्या नशेत मंत्री मर्यादा विसरत आहेत का, असा प्रश्न आता जनतेत उपस्थित होत आहे. विरोधकांना हाणून पाडण्यासाठी सज्ज असलेली महायुती आता अंतर्गत शिस्तीच्या समस्यांशी झुंजत असल्याचं चित्र या सर्व घडामोडींमधून स्पष्ट दिसतं आहे.
____








