abhijit-dipke-family-assets-investigation-demand-kapil-sibal-legal-fund-election-commission-letter : कायदेशीर मदत निधीवरून निवडणूक आयोग आणि कर विभागालाही पत्र
Mumbai: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरतमधील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत निवडणूक आयोगासह कर विभागातील अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. अभिजित दिपके यांच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी कुठून उपलब्ध झाला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
अमित तिवारी यांनी आपल्या पत्रात कॉकरोच जनता पार्टी ही अधिकृतपणे नोंदणीकृत संघटना आहे की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, जर एखादी संस्था राजकीय पक्षाप्रमाणे काम करत असेल आणि सार्वजनिक स्वरूपात निधी उभारणी करत असेल, तर तिची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या संघटनेची नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि निधी संकलनाची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनांदरम्यान विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी हा निधी उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अमित तिवारी यांनी केंद्रीय कर विभागाशी संपर्क साधत या निधीवर वस्तू आणि सेवा कर लागू होतो का, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने २७ जुलै रोजी देशभरातील विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष संरक्षण निधी उभारण्याची घोषणा केली होती. या निधीसाठी कपिल सिबल यांनी एक कोटी रुपयांचे योगदान देण्याची तयारी दर्शवली असून देशभरातील वकिलांनीही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कपिल सिबल यांनी सांगितले की, विविध राज्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची माहिती आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या वकिलांची नोंद असलेली स्वतंत्र वेबसाइट तयार करण्याचाही प्रस्ताव समोर आला आहे.
Uddhav Thackeray : शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार; नाही तर ते गोठवलं जाईल
अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील डिजिटल मीडिया रणनीतीकार असून त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या मोहिमेचे रूपांतर पुढे नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात झाले.
सध्या अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी आणि कायदेशीर मदत निधी याभोवती निर्माण झालेल्या वादामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
__








