chandrashekhar-bawankule-reaction-on-sanjay-raut-claim-about-devendra-fadnavis-delhi-role : संजय राऊतांच्या दाव्यावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात जाणार असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या वावड्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्याची क्षमता फडणवीस यांच्यात आहे आणि ते राज्यातच राहणार आहेत. संजय राऊत यांच्याकडे तिसरा डोळा आहे की नाही, हे मला माहीत नाही; मात्र अशा अफवांकडे लक्ष देण्याची गरज नाही.”
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिल्याचा दावा केला होता. त्यावर बावनकुळे यांनी फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठीच काम करत राहतील, असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीवर नाराजी व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले, “अशा प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांनी कसे वागावे, हे ठरवले पाहिजे. महायुतीत काम करत असताना अशा प्रकारचे वर्तन योग्य नाही.”
Bhujbal Vs Mahajan : खड्ड्यांवरून महायुतीत वादाच्या चर्चांवर पडदा !
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर कार्यक्रमासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीजबिलापासून दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच शेतमजूर महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता देण्याचे काम करण्यात आले आहे.”
Abhijit dipke : अभिजित दिपके यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
मतदार पडताळणी मोहिमेचा उल्लेख करताना बावनकुळे यांनी सांगितले की, विशेष पुनरावलोकन प्रक्रियेत मृत व्यक्ती किंवा घुसखोरांची नावे मतदार यादीत राहणार नाहीत. चिपळूण मतदारसंघाने या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
यावेळी कोतवालांसाठी मोठी घोषणा करताना बावनकुळे म्हणाले की, तलाठी भरती प्रक्रियेत कोतवालांना वीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. याशिवाय पुढील दोन वर्षांत संपूर्ण जिल्ह्यातील जमिनींचे मोजमाप पूर्ण केले जाईल आणि जमिनीची मोजणी झाल्याशिवाय नोंदणी होणार नाही, असा कायदाही सरकार आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील नवीन कायदा आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे आश्वासनही महसूलमंत्र्यांनी दिले.
_








