Congress state president hits out at Adani – Lodha : अदानी – लोढा यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा टोला
Mumbai : कबुतरखान्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर तीव्र टीका केली आहे. कबुतरांना जसे जगण्याचा अधिकार आहे, तसाच माणसांनाही आहे, मात्र कबुतरांच्या पंखांमुळे आणि विष्ठेमुळे गंभीर फुप्फुसाचे आजार होतात, काहींचा जीवही जातो, हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. परंतु भाजप सरकारने मुद्दाम ‘कबुतर जिहाद’ सुरू केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
टिळक भवन येथे एनएसयुआयचे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर ऐतिहासिक संदर्भ देत जोरदार हल्ला चढवला. “अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी लोक काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी अदानी आणि गृहनिर्माण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही निशाणा साधला. “सरकारने अर्धी मुंबई अदानीला दिली आहे. लोढा यांच्याकडे मुंबईत मोठ्या प्रमाणात जमीन आहे. मग लोढा आणि अदानी यांनी एकत्र ‘कबुतर प्लाझा’ उभारावा,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
Uddhav Balasaheb Thackeray :उद्धव ठाकरेंवर टीका करताना आमदाराची जीभ घसरली
दरम्यान, कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीने दादर येथे मोर्चा काढला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही कबुतरखाने सुरू असल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. समितीने पोलिस कारवाईवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, आक्रमक आंदोलनावेळी कारवाई होत नाही, पण निवेदन देताना कार्यकर्त्यांवर कारवाई होते.








