Central Government has no role in NEET paper leak, Chandrashekhar Bawankule claims : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे विधान
Nagpur NEET परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीत तरुणांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर विरोधकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना आता भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारचा बचाव केला आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणात सरकारचा कोणताही दोष नसल्याचे सांगत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची अजिबात गरज नाही असे ठामपणे स्पष्ट केले आहे.
NEET paper leak : लाठीमार करून विद्यार्थ्यांचा राग शांत होणार आहे का?; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, NEET पेपरफुटीची घटना अत्यंत निषेधार्ह होती, मात्र हा सरकारचा दोष नसून व्यवस्थेतील एक त्रुटी होती आणि ती सरकारने वेळीच दुरुस्त केली आहे. संपूर्ण प्रकरणात सरकारने कोणालाही पाठीशी न घालता स्वतःहून तात्काळ चौकशी आणि कारवाई केली आहे.
Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा; उद्या प्राथमिक यादी जाहीर होणार
जतर-मंतरवरील आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, हे आंदोलन केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि तरुणांना भडकवण्यासाठी आयोजित करण्यात आले असून आंदोलनस्थळी दगडफेकीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर दगड गोळा करून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामागील हेतू आणि संबंधित असामाजिक तत्त्वांची सरकारकडून चौकशी सुरू असून, जाणीवपूर्वक सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा आणि जनतेमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी यातील तथ्ये लक्षात घेण्याचे आवाहन केले.








