Teachers are not to blame for the Shalarth ID scam, seize the assets of the institution’s directors : बऱ्याच लोकांनी २५ ते ३० लाखांचे कर्ज घेतलेले आहे
Nagpur : नागपुरात उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. शिक्षक पदावर नियुक्त करण्यासाठी मोठी प्रलोभने देऊन खोट्या शालार्थ आयडी तयार करून नियुक्त्या केल्या गेल्या. शिक्षक म्हणून नोकरी मिळवायची असेल तर काय काय करावं लागतं, हे सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये शिक्षकांचा दोष नाही. ज्या संस्थाचालकांनी बदमाशी केली, त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नागपुरात काल (१८ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, काही लोकांनी २५ ते ३० लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. या प्रकरणातील संस्था चालकांची संपत्ती जप्त केली पाहिजे. यासंदर्भात मी शिक्षण मंत्र्यांशी बोलणार आहे. या प्रकरणात शिक्षकांचा दोष नाही. आता त्यांना आधार कसा देता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. १२ वर्षांपासून ते काम करत आहेत आणि पगार सुरू असताना आता त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात विचारले असता, मतदार याद्यांचं पुर्नसर्वेक्षण नेहमी सुरू असतं. त्यामुळे रोज रोज मतदार समाविष्ट होत असतात. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदार यादीत कुणाचाही नाव समाविष्ट झालं किंवा नाही झालं, तर त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याबद्दल निवडणूक आयोग प्रत्येक राजकीय पक्षाला आक्षेप घेण्यासाठी नोटीस देतात. या संपूर्ण निवडणुकीत एक लाख बुथवर आक्षेप घ्यायला पाहिजे होता. तो पूर्वी घेतला गेला नाही. निवडणूक हरल्यावर मुर्खासारखे सात महिन्यांनी हे आरोप करतात. याला अर्थ नाही. जेव्हा नेतृत्व क्षमता संपते तेव्हा दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. नेमकं तेच काम हे लोक करत आहेत, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.








