Nana Patole claims Eknath Shinde went to Delhi due to the troubles caused by Devendra Fadnavis : अंतर्गत विद्रोहाची तक्रार करण्यासाठी भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याचा दावा
Nagpur महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापासून ते शासकीय जमिनींच्या लिलावापर्यंत आणि आरक्षणाच्या पेटत्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवरून त्यांनी आक्रमत मते मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. याच त्रासाची आणि अंतर्गत विद्रोहाची तक्रार करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट दिल्लीत धडकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. सर्वसामान्य खासदार किंवा नेते पंतप्रधानांना भेटायला जाण्यामागील राजकीय अर्थावर थेट भाष्य करणे टाळले जात असले, तरी महायुतीमधील हा अंतर्विरोध आता लपून राहिलेला नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामागील हेतूंवरही नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील उरलीसुरली शासकीय संपत्ती आणि जमिनी उद्योगपती मोदी मित्रांच्या’ घशात घालण्यासाठी अजून किती संपत्ती बाकी आहे आणि किती वाटायची आहे, याची पाहणी करण्यासाठीच शाह वारंवार महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, देशातील युवा वर्गाचा रोष आता चव्हाट्यावर आल्याचे नमूद करत पटोले म्हणाले की, अलीकडेच सरसंघचालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणांनी शिक्षणाच्या खाजगीकरणाविरोधात उघड भूमिका घेतली आहे. आज भाजप आणि संघ मिळून शिक्षणाचे बाजारीकरण करत असून, त्यामुळे सामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे, असा आवाज विद्यार्थ्यांनी उठवला आहे.
गेल्या १२ वर्षांत देशभरातील विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारने केले असून, याच वाढत्या असंतोषाचा परिणाम म्हणून आज जेन झी रस्त्यावर उतरली आहे. या दबावामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली असून, हे देशात परिवर्तनाचे मोठे संकेत असल्याचे मानले जात आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.








