CMO interfered in voter lists, claims Praful Gudadhe : मुख्यमंत्री कार्यालयातून मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा खळबळजनक दावा
Nagpur नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे आणि भाजप नेते दयाशंकर तिवारी यांच्यातील वाद आता अधिकच विकोपाला गेला आहे. तिवारी यांनी दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपला असून, आपल्याला अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही, असे सांगत गुडधे यांनी माफी मागण्यास सक्त नकार दिला आहे. तसेच, नागपुरातील विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून भाजप कार्यकर्त्यांमार्फत मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल गुडधे म्हणाले की, आपण दयाशंकर तिवारी यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. आपल्या व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ पैसे मोजण्याचा इशारा होता, त्यात कुणाचेही नाव घेण्यात आले नव्हते. मात्र, तिवारी यांनी त्याचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ काढून तो मनाला लावून घेतला. तिवारी यांनी मला मानसिक रुग्ण म्हटले, पण मला मानसिक रुग्ण ठरवण्यासाठी त्यांच्याकडे कोणती वैद्यकीय डिग्री आहे? जेव्हा मुद्यांवर उत्तर देता येत नाही, तेव्हा वैयक्तिक आरोप करायचे ही भाजपची जुनी रणनीती आहे,” असा पलटवार गुडधे यांनी केला. नोटीस आल्यास न्यायालयात कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरातील मतदार याद्यांच्या पडताळणी आणि विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत गुडधे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. निवडणूक आयोगाच्या नियमांना डावलून राबवल्या जात असलेल्या या प्रक्रियेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ च्या मतदारांची नावे २००२ च्या मतदार यादीत असणे बंधनकारक करण्याचे नियम कोणत्या आधारावर ठरवले? हा मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कटऑफबाबत विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी हतबलता दर्शवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सुरू असलेल्या गैरप्रकारांचा पर्दाफाश करताना गुडधे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी उघड केलेल्या पॅरलल सॉफ्टवेअरप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या हैदराबाद हाऊस भाजप कार्यकर्त्यांमार्फत मतदारांचे वर्गीकरण केले जात आहे. प्रशासनाला मदत करण्याच्या नावाखाली नागपुरात बाहेरचे सुमारे ५०० लोक आणून भाजप कार्यकर्त्यांकडून यंत्रणेत सर्रास हस्तक्षेप केला जात असून, प्रशासकीय अधिकारी या दबावाखाली काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.








