Harish Pimple : उमा बॅरेज प्रकल्पात तब्बल २७ कोटींचा घोटाळा?, आमदार हरीष पिंपळे यांचा गंभीर आरोप

MLA alleges scam worth Rs 27 crore in Uma Barrage project : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे

Akola मूर्तिजापूर तालुक्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. या प्रकल्पात सुरुवातीला ९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. मात्र, आमदार हरीष पिंपळे यांनी या घोटाळ्याची रक्कम तब्बल २७ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा करताच प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी आणि तीन कंत्राटदार अशा सात जणांविरुद्ध मानापोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता गौरव प्रकाश बोबडे यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कलम ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६८, ४७१, १२० (ब) भा.दं.वि. १८६० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Sudershan Reddy : सर्व राजकीय पक्षांकडे पाठिंबा मागणार, न्या. रेड्डी लागले तयारीला

तक्रारीनुसार, १ मार्च २०११ ते ३१ मार्च २०१२ दरम्यान उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्या द्वारनिर्मिती आणि उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करण्यात आले. या गैरव्यवहारामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

आमदार पिंपळे म्हणाले, “२०१२ मधील हा भ्रष्टाचार असून तेव्हापासून प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे. राजकीय वरदहस्तामुळे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आता शासनाचा एक रुपया देखील वसूल केला जाईल. दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई होईल.”

Chandrashekhar Bawankule : वितरीत निधी खर्च झाला नाही तर थेट कारवाई

या प्रकरणाचा तपास अकोल्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासातच घोटाळ्याची रक्कम नऊ कोटींपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. यामध्ये आणखी कोण-कोण दोषी आहेत याचा उलगडा तपासाअंती होणार आहे.