महाराष्ट्रावर गंभीर संकट; वीज केंद्रांपुढे मोठे आव्हान
Nagpur राज्यात दुष्काळाच्या सावटापाठोपाठ आता विजेचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या साठ्यात कमालीची घट झाली असून महानिर्मितीकडे (महाजेनको) अवघ्या तीन दिवस पुरेल इतकाच, म्हणजेच केवल ५.५ लाख मेट्रिक टन कोळसा शिल्लक राहिला आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, ऊर्जा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही या बिकट परिस्थितीला दुजोरा दिला आहे.
नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रात अवघ्या दीड दिवसांचा, तर नाशिक आणि चंद्रपूर वीज केंद्रांमध्ये केवळ ३ दिवसांचा कोळसा साठा शिल्लक राहिल्याने दिवाळीच्या तोंडावरच वीज निर्मिती ठप्प होऊन मोठा वीज तुटवडा निर्माण होण्याचा धोका वर्तवला जात आहे.सध्या राज्यात विजेची मागणी तब्बल २८ ते ३० हजार मेगावॅटच्या घरात पोहोचली आहे.
पाऊस लांबल्यामुळे आणि शेतीसह इतर कामांसाठी विजेचा वापर वाढल्याने कोळशावर आधारित प्रकल्पांमधून उत्पादन वाढवावे लागत आहे. शिवाय, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोलर यंत्रणा बसवल्यामुळे दिवसा त्याचा वापर होतो, तर रात्रीच्या वेळी ग्रीडवरील विजेचा वापर प्रचंड वाढतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी विजेचा वापर कमी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कोळसा खाणींच्या क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्खनन आणि पुरवठ्यावर विपरित परिणाम झाल्याची माहिती महाजेनकोकडून दिली जात आहे.
मात्र, या कमतरतेमुळे वीज उत्पादन ठप्प होऊ दिले जाणार नाही असा दावा महाजेनकोने केला असून, सध्या कोळसा कंपन्या आणि भारतीय रेल्वेशी तातडीने समन्वय साधून साठा वाढवण्याचे प्रयत्न युद्धापातळीवर सुरू असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.








