OBC Quota Will Remain Intact, Assures Minister of State for Home : लेखी मिळणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्वस्थ बसणार नाही
Nagpur : मराठा नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याची राजधानी मुंबईकडे कुच केली. तेव्हा इकडे उपराजधानी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरला. संविधान चौकात महासंघाने साखळी उपोषण सुरू केले. हा ओबीसींच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. यातून मार्ग न निघाल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघसुद्धा मुंबईकडे कुच करणार, यात काही शंका नाही. तसे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी बोलूनही दाखवले आहे. अशात आज गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संविधान चौकात ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट दिली.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी घोषणा शासनाचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री भोयर यांनी केली. पण मराठा आंदोलनामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे शासनाने आम्हाला लेखी द्यावे, त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. त्यावर शासनातर्फे डॉ. भोयर यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. राजधानीत मराठा समाज आणि उपराजधानीत ओबीसी समाज दोघेही दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. आता सरकार यामध्ये कुठला मध्य मार्ग काढणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Pankaj Bhoyar : जरांगेंच्या मागे कोणती अदृश्य शक्ती, हे फडणवीस योग्य वेळी सांगतील !
दरम्यान नागपुरात ओबीसींच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळतो आहे. आज (१ सप्टेबर) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सेवक वाघाये, तिरळे कुणबी समाज संघटना, अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज संघटना, विदर्भ माध्यमिक संघाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला पाठिंब्याचे पत्र दिले. यामध्ये भूषण दडवे, अनिल गोतमारे, माजी नगरसेवक प्रकाश भोयर, भाजप ओबीसी सेलचे प्रकाश बगमारे यांनी पाठिंबा घोषित केला.
आज उपोषणात शरद वानखेडे, परमेश्र्वर राऊत, शकील पटेल, शंकर मौर्य, निखिल भुते, नाना झोडे, विनोद इंगोले, वृषभ राऊत, राहुल करांगडे, निलेश कोढे, दीपक कारेमोरे, रितेश कडव, श्रीकांत मकमारे, अनंत बारसागडे यांनी सहभाग घेतला.








