vijay-wadettiwar-on-manoj-jarange-neelam-gorhe-criticism : ‘धमक्या देऊ नका’ म्हणत नीलम गोऱ्हेंवरही जोरदार हल्लाबोल
Mumbai : मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधी आणि इतर व्यक्तींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे यांनी गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवर जोरदार निशाणा साधला. जरांगे ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. “त्यांचं ज्ञान आभाळातून आलेलं आहे. पुस्तकी ज्ञान असतं तर ते असं बोलले नसते,” असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित केला. खोटी प्रमाणपत्रे दिल्यामुळे लोकांचा वेळ वाया जात असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. “मुलांच्या आयुष्याशी खेळणं बंद करा,” असे आवाहन त्यांनी केले.
Manoj Jarange : ‘मला त्या वाटेवर नेऊ नका’; मनोज जरांगेंचा संतप्त इशारा
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींना आरक्षण संविधानिक तरतुदींमधून मिळाले आहे. त्यामुळे कोणतीही मागणी करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच मार्ग काढला पाहिजे. “कायद्याच्या चौकटीत काय मिळवायचं ते मिळवा, धमकी देऊ नका,” असा थेट संदेश त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे यापूर्वी काही मंत्र्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवरही टोला लगावला. दोन-तीन मंत्री गेले होते, आता आठ-दहा मंत्री जातील आणि ते खुर्च्या टाकून बसतील, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच सत्ताधारी नेते आता जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील, असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले.
Tukaram Mundhe : ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोण सर्वांत बेस्ट मुख्यमंत्री?
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातनिहाय जनगणना करण्याचे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात त्याबाबत ठोस हालचाल होताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
ओबीसींची खरी लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार समाजाला त्यांच्या हक्काच्या सुविधा व सवलती मिळाव्यात, यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मंडल यात्रेच्या माध्यमातून याबाबत जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बांठिया आयोगापासून ओबीसींच्या गणनेशी संबंधित आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणीही केली.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली. सरकारच्या गृह खात्याविरोधात जिथे राजकीय फायदा मिळवता येईल, तिथे नीलम गोऱ्हे पोहोचतात, असा आरोप त्यांनी केला.
Nana Patole : फडणवीसांच्या त्रासामुळेच शिंदेंची दिल्ली वारी, नाना पटोलेंचा हल्लाबोल
अंबादास दानवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील, तर तो राजकीयदृष्ट्या सूचक संदेश असू शकतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. एखादा पक्ष संघाच्या जवळ जात असेल तर त्याबाबत त्या पक्षानेच भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील रस्त्यांच्या खराब अवस्थेवरूनही सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“४० टक्के कमिशन खाल्लं तर रस्त्यांची स्थिती काय राहणार?” असा सवाल करत त्यांनी ठेकेदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे रखडल्याचा दावा केला. ठेकेदाराने गिट्टीऐवजी निकृष्ट साहित्य वापरल्यास रस्त्यावर मातीच दिसेल, अशी टीकाही त्यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था खराब झाली असून सरकारने निधी वाटपातील कथित टक्केवारीच्या व्यवहाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
शरद पवार यांच्या पक्षाचे काही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेवरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. विकासाच्या कामांसाठी ही भेट होत असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांच्या भेटीगाठींकडे आपले लक्ष असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आगामी मतदारसंघ पुनर्रचना अर्थात सीमांकनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नियोजन सुरू आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपवरही विजय वडेट्टीवार यांनी जोरदार आरोप केला. भाजपकडून एक-एक राजकीय पक्ष संपवण्याचे किंवा आपल्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. “भाजप अजगरासारखा एक-एक पक्ष गिळंकृत करतोय,” अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकीय रणनीतीवर टीका केली.
मनोज जरांगे यांच्या आक्रमक वक्तव्यांपासून ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, रस्त्यांची अवस्था आणि राज्यातील राजकीय घडामोडींपर्यंत विविध मुद्द्यांवर विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
_








