Kamthi Blast Will Echo Nationwide, Warns Congress State Chief Harshvardhan Sapkal : ७५ वर्षांवरील नेत्यांना खुर्च्या सोडाव्या लागणार, मोदींच्या पायाखालची वाळू सरकली
Nagpur : मतांची चोरी करून हे सरकार सत्तेत आले आहे, असा आरोप गेल्या महिन्यात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह केला होता. त्यानंतर काँग्रेसने ‘व्होट चोर गद्दी छोड’ हे मेळावे घेण्यास कालपासून (३ सप्टेंबर) सुरूवात केली आहे. पहिला मेळावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात कामठी घेण्यात आला. आज कामठीत हा धमाका झाला. आता हा धमाका देशभर पोहोचणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
मेळाव्याला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनील केदार, नसीम खान, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोळे, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
७५ वर्षे वय पूर्ण केलेल्या नेत्यांना खुर्च्या सोडण्याचे आदेश संघाकडून निघालेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाबरगुंडी उडालेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता देशात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील. त्यानंतर शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे नवे सरकार येईल. ‘व्होट चोर – गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही. मतांची चोरी करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचू, असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले. मंचावर उपस्थित काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी यावेळी सत्ताधार्यांवर तोफ डागली.








