Government’s decision, a big success for the Maratha movement : सरकारचा निर्णय, मराठा आंदोलनाला मोठं यश
Mumbai : मराठा आंदोलनाला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी दिला होता. तो शब्द पाळत सरकारने आता अधिकृत घोषणा केली आहे. मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
सरकारने या महिन्याअखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व किरकोळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक सोमवारी संबंधित जिल्हाधिकारी गुन्ह्यांचा आढावा घेऊन समितीपुढे प्रस्ताव ठेवतील. यामुळे अनेक आंदोलकांना दिलासा मिळणार आहे.
त्याचवेळी आंदोलनादरम्यान मृत झालेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यांच्यासाठीची मदत रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली असून, वारसांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
दरम्यान, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मोडी लिपी अभ्यासकांच्या मदतीने अहवाल तयार करण्याचे आदेशही समितीकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.








