Congress Leader Vijay Wadettiwar Levels Serious Allegations Against State Government : सद्यस्थितीत सरकारला पोषक वातावरण नाही
Mumbai : भाजपने सन २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. कारण त्यांना सर्वत्र प्रशासक म्हणून आपली माणसे बसवायची होती. मागील काळात त्यांच्यासाठी पोषक वातावरण नव्हते, म्हणून या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. आताही नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकल्या असत्या. पण सद्याही सरकारसाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे निवडणुका पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ढकलण्यात आल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, राज्यात पावसाळा संपत आला आहे. पुढच्या महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घ्यायला काहीच हरकत नव्हती. पण सद्यस्थितीत राज्यात शेतकरी अडचणीत आहे. मराठा विरूद्ध ओबीसी वातावरण चिघळले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना निश्चितच असे वातावरण चांगले नाही. त्यामुळे ते निवडणुका घेत नसतील. प्रभाग रचनेचे कारण दाखवून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. काल (१६ सप्टेंबर) न्यायालयाने सरकारला झापले आहे. आता तरी त्यांना सुबुद्धी यावी.
Kunbi certificate : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू
काल कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीतून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. पण ही बैठक शेतकऱ्यांना निराश करून गेली. शेतकरी रडत आहेत, टाहो फोडत आहेत. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयीबीनवर कीड आली आहे. पण सरकारला इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांसाठी सरकारकडे पैसा आहे. पण शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. अशी विचित्र परिस्थिती सध्या राज्यात आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. सरकाला शेतकऱ्यांप्रति आस्था नाही. त्यांना विविध प्रकल्प राबवून पक्षाला आर्थिक बळ तेवढे मिळवून द्यायचे आहे. जनतेची सरकारला काळजी नाही, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.








