Heavy Rains Cause Massive Damage : अतिवृष्टीने ३० जिल्ह्यांत प्रचंड नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये द्या !

Congress Leader Vijay Wadettiwar Writes to CM Devendra Fadnavis : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Mumbai : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यभर अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी जीवीत हानीही झाली. या अतिवृष्टीने राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना आधीच कर्जमाफी झाली नाही अन् आता तर जवळपास हाती आलेले पिकही खरडून गेले. आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

यासंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. ते लिहितात, ‘काल (१६ सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकरी आस लाऊन बसला होता. आता तरी आपल्याला मायबाप सरकारकडून काही मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण या बैठकीतदेखील शेतकरी हिताचा निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा सरकारने करावी.

New India : हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो !

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापुस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. आता शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत करावी. याशिवाय बॅंकांकडून सुरू असलेली वसुलीही थांबवावी. पिक विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे’, असे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.