Chandrashekhar Bawankule’s surprise inspection Cash found in officer’s drawer : अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे, तातडीने आले पोलिस
Nagpur : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर शहरातील खामला परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलांची झाडाझडती घेतली. यावेळी एका अधिकाऱ्याच्या टेबलमधील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम सापडली. त्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले, पोलिसही लगेच आले. बावनकुळेंच्या या धाडीने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
या कार्यालयात अनियमित पद्धतीने रजिस्ट्री केली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. त्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्वतः या कार्यालयाची झाडाझडती घेतली. नागपूर शहरातील क्रमांक चार कार्यालयामध्ये ही कारवाई आज (६ ऑक्टोबर) करण्यात आली. अधिकारी अतुल कपले यांच्या टेबलावरी कागदपत्रांची तपासणी स्वतः महसूल मंत्र्यांनी केली. आजच्या तारखेत झालेल्या रजिस्ट्रीला कोणकोणते कागदपत्रं जोडले गेले आहेत, हेसुद्धा महसूल मंत्र्यांनी स्वतः तपासले. सावनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातही महसूल मंत्र्यांनी अशीच धाड टाकली होती, तेथेही गैरप्रकार आढळला होता.
सह दुय्यम निबंधक अधिकारी अतुल कपले या अधिकाऱ्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये बावनकुळे यांना पैसे आढळले. त्यांनी याबाबत कपले यांना विचारणा केली. यावर कपले समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ही कारवाई केल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दुय्यम निबंधक कार्यालयात सातत्याने गैरप्रकार होतात, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यानंतर आज हे धाडसत्र राबवले. मी येथे आलो तेव्हा या टेबलच्या ड्रॉवरला कुलूप होते, ते उघडायला लावले, त्यात रोख रक्कम सापडली आहे.
एका रजिस्ट्रीचे पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात, अशा तक्रारी होत्या. त्याची तपासणी करण्यासाठीच मी स्वतः येथे आलो आहे. नियमानुसार ३० लाख रुपयांच्या वरचे व्यवहार इन्कम टॅक्स विभागाला कळवावे लागतात, तेसुद्धा या कार्यालयातून कळवले गेले नाहीत. त्यामुळे मोठी अनियमितता झालेली आहे, हे स्पष्ट आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन केलेले आहेत. त्यामुळे रोख रक्कम असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता पोलिस याचा तपास करतील. सापडलेली रक्कम त्या अधिकाऱ्याची वैयक्तिक आहे की लाचेची हे त्यानंतर स्पष्ट होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. एटंटच्या माध्यमातून लाचेची रक्कम घेतली जाते. अशा एजंट, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.








