Shiv Sena Opposes Alliance with Congress and NCP : माजी मंत्र्याच्या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडीला विरोध
Akola शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते माजी मंत्री अरविंद सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला. गेल्यावेळी महाविकास आघाडी म्हणून लढल्याचा फायदा झाला असला तरीही यंदा स्वबळावरच लढायला हवे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत आघाडी करून चांगली कामगिरी केली होती. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावर लढावे, अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांच्यासोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर घेता येईल, असे निर्देश खासदार अरविंद सावंत यांनी दिले. या निर्णयाबाबत स्थानिक नेते व पदाधिकारी कोणता मार्ग स्वीकारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Local Body Elections : बुलढाणा नगर पालिकेत महिला राज, नगराध्यक्षासह सदस्यांच्या १५ जागा राखीव
दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन अरविंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीत खासदार सावंत यांच्यासोबत पक्षाचे सहसंपर्क नेते सेवकराम ताथोड, उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, तसेच मंगेश काळे, महिला संघटिका सरिता वाकोडे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, मुकेश मुरुमकार, तरुण बगेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.








