Dispute Between Mahayuti and Maha Vikas Aghadi Over Nehru Ground : बावनकुळे म्हणतात, बांधकाम होणार नाही; खोडके म्हणतात, विकासाला विरोध खेदजनक
Amravati अमरावतीतील ऐतिहासिक नेहरू मैदानावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मैदानाचे सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, शहर विकासाशी संबंधित प्रकल्पांना विरोध होणे खेदजनक असल्याची भूमिका आ. संजय खोडके यांनी मांडल्याने या विषयावर राजकीय वाद पेटला आहे.
बावनकुळे म्हणाले, “अमरावतीचे नेहरू मैदान, दसरा मैदान आणि सायन्सकोर मैदान ही सर्व मैदाने शहराचे वैभव आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही. उलट या मैदानांच्या स्वच्छतेचा आणि संवर्धनाचा कार्यक्रम भाजपाच्यावतीने लवकरच राबवला जाणार आहे.”
Local Body Elections : ५९ गटांसाठी आरक्षण सोडत; महिलांसाठी अर्ध्या जागा राखीव
ते पुढे म्हणाले, “नेहरू मैदान हे ऐतिहासिक आणि वैभवशाली ठिकाण आहे. ज्या भागात महानगरपालिकेच्या जुन्या इमारती आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून नवीन विकास आराखडा राबविण्यात येईल. तसेच मैदानाचे सौंदर्यीकरण आणि दुरुस्ती करून ते अत्याधुनिक स्वरूपात साकारण्यात येईल.”
भाजपने रविवारी पत्रकार परिषद घेऊन नेहरू मैदानावर अमरावती महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत उभारण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी स्वतःच भूमिका स्पष्ट केल्याने महापालिकेची इमारत उभारण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे भाजपने नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके म्हणाले, “नेहरू मैदानाच्या जागेवर शहर विकासाचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांच्या बैठकीतच चर्चा झाली होती. जनविकासाच्या दृष्टीने असलेल्या या प्रकल्पांना विरोध होणे खेदजनक आहे.”
खोडके यांनी सांगितले की, “शहराच्या मध्यभागी असूनही नेहरू मैदानाची स्थिती अत्यंत दुरवस्थेत आहे. येथे कुठलीही सुविधा नाही. अमरावती महापालिकेची नूतन प्रशासकीय इमारत येथे साकारावी, या विषयावर महापालिकेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु भाजपने विरोधाची भूमिका घेतल्याने विकासकामांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.”
Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी अमरावती शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शिंदे गट) यांच्यातील समन्वयाचा अभाव नेहरू मैदानाच्या वादातून प्रकर्षाने समोर आला आहे. भाजपने “मैदानावर बांधकाम होऊ देणार नाही” अशी ठाम भूमिका घेत शहरातील मैदाने वाचवा कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काँग्रेस नेते व माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आमदार दाम्पत्यांच्या भूमिकेवर टीका करत, “ही कृती शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर घाला घालणारी आहे,” असे म्हटले आहे. परिणामी, नेहरू मैदानाच्या जागेवरून अमरावतीत सत्तारूढ पक्षांमध्येच रणकंदन माजले असून, पुढे या विषयावर कोणते ‘राजकारण’ घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








