Anjali Damania will make a big revelation in the Parth Pawar land case. : पार्थ पवार जमीन प्रकरणात अंजली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडवणारे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर दमानिया यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे आपण सर्व संबंधित कागदपत्रे दिली असून, त्याच संदर्भात उद्याच्या पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती सादर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, “माझी महसूल मंत्र्यांसोबत बैठक झाली. मला समितीसमोर सर्व पुरावे सादर करायचे आहेत आणि माहिती समितीचे प्रमुख विकास खारगे यांना ती द्यायची आहे. हे सर्व लँड माफिया कसे घोटाळे करतात, हे मी उघड करणार आहे. पुण्यातील गायकवाड कुटुंबाचे दस्तऐवज मी बावनकुळेंना दाखवले आहेत. १९३२ सालच्या महार वतनाच्या सनदेतून सरकारकडे जमीन दिल्यानंतर त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत, याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. या प्रकरणात सरकारने एक सुनावणी घेतल्यानंतर ती जमीन गायकवाड कुटुंबाला द्यायची की नाही हे ठरवावे लागेल,” असंही त्यांनी सांगितलं.
Arvind Sawant : महाविकास आघाडीसोबत लढायचे की स्वबळावर, तुम्हीच ठरवा!
दमानिया यांनी पुढे आरोप केला की, सरकारने ४२ कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याची नोटीस काढली असली तरी महसूल विभागाने यासंदर्भात कोणतीही तपासणी केली नाही. हे प्रकरण पूर्णपणे कोर्टात जाणार असून, मी उद्या या संदर्भातील काही महत्त्वाचे पुरावे सादर करणार आहे. “या सर्व घोटाळ्यांमध्ये राजकारण दडलेलं आहे. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या १५-१६ वर्षांत काहीच सिद्ध झालं नाही. पण सगळं सिद्ध झालं होतं, फक्त तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे सर्व बाजूला टाकण्यात आलं,” असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला.
त्या म्हणाल्या, “सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पण इतर घोटाळ्यांमध्ये तुम्ही कुठेही जा अमित शाहांकडे जा किंवा कुणाकडेही जा, आम्ही कोर्टात जाऊ आणि प्रकरण तडीस नेऊ. बोगस कंपन्या बनवून जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. हे सर्व पुरावे मी उद्या मांडणार आहे.” दमानिया यांनी अजित पवारांसोबतच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. “सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर मौन धरण्याऐवजी समर्थन दिलं, ही गोष्ट खेदजनक आहे,” असे त्या म्हणाल्या.
Amol Mitkari : “हकालपट्टी नाही, अजित दादांचा कार्यकर्ता असणेच माझं पद”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दमानिया यांनी कठोर शब्दात टीका केली. त्या म्हणाल्या, “२०११ साली मला फडणवीसांवर अपेक्षा होती, कारण ते सिंचन घोटाळ्याविरोधात बोलत होते. तेव्हाचे ‘अजित दादा चक्की पिसींग-पिसींग’ हे त्यांचे विधान आठवतं. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत तीनदा शपथ घेतली. अजित पवार आता फडणवीसांचे मित्र झाले आहेत, त्यामुळे मला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही.”
Local Body Elections : महानगरपालिकेत ‘महिलाराज’; आरक्षणाने काहींना ‘दे धक्का’
दमानिया यांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि इतर घडामोडींवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “पालकमंत्र्यांविरोधात कोणी बोलू शकत नाही, कारण तो पार्थ अजित पवार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. दिग्विजय पाटील हे या प्रकरणातील फक्त प्यादे आहे, त्याने अथॉरिटी लेटरवर सही केली होती.” शेवटी दमानिया म्हणाल्या, “पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडून काढून घ्यावं. त्यांनी स्वतःहून राजीनामा देणं अपेक्षित आहे.”
दरम्यान, उद्याच्या अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे राजकीय वर्तुळ आणि प्रशासन यांचेही लक्ष लागले आहे. या खुलाशांमुळे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








