Bihar Elections : अकोल्याच्या पुत्राचा बिहारच्या निवडणुकीत पराभव

Son of Akola faces defeat in the Bihar elections : अररिया व जमालपूर दोन्हीकडे आले अपयश

Akola बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला वेग आल्यापासून महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले होते ते अररिया आणि जमालपूर या दोन हायप्रोफाईल मतदारसंघांकडे. कारण, या दोन्ही मतदारसंघांत अकोल्याचे सुपुत्र आणि ‘बिहारचे सिंघम’ म्हणून ख्याती मिळवलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मैदानात उतरले होते. खाकी सोडून खादी स्वीकारत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र मतमोजणीत दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

अररिया : चौथ्या स्थानावर समाधान

अररिया मतदारसंघात जदयूकडून शगुफ्ता आझीम, काँग्रेसकडून अबिदुर रहमान तर एमआयएमकडून तिसरे उमेदवार रिंगणात होते.
या मतदारसंघात शिवदीप लांडे यांना पाच हजार मतंही मिळवता आले नाही.

Maharashtra politics : बिहार निकालाच्या धामधुमीत महाराष्ट्रात अचानक राजकीय हालचाल !

जमालपूर मध्ये अपेक्षाभंग

जमालपूर मतदारसंघात जेडीयूने मोठा राजकीय डाव टाकत माजी मंत्र्याचे तिकीट कापून नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. तिकीट न मिळाल्याने संतप्त माजी मंत्र्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा मार्ग अवलंबला.
सहा फेऱ्यांनंतर नचिकेता मंडल यांनी विजय मिळवला, तर इंडियन इन्क्लुजिव्ह पार्टीचे नरेंद्र कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या मतदारसंघात शिवदीप लांडे यांना 15 हजारांवर मतं मिळाली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

लांडेंचा राजकीय प्रवास ठरला कठीण

४९ वर्षीय शिवदीप वामनराव लांडे हे अकोला जिल्ह्यातील पारस येथील रहिवासी. ‘बिहारचे सिंघम’ अशी लोकप्रिय ओळख मिळवणारे लांडे हे २००६ बॅचचे आयपीएस अधिकारी. बिहारमधील अररिया, पूर्णिया, मुंगेर जिल्ह्यांमध्ये तसेच तिरहुत व कोसी विभागाचे डीआयजी म्हणून त्यांनी काम पाहिले.
२०२४ मध्ये त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा देत ‘हिंद सेना’ नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला; मात्र पक्षाची नोंदणी बाकी असल्याने त्यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरायचा निर्णय घेतला.

Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवारांना दोन मोठे राजकीय धक्के

दोन मतदारसंघांतून लढण्याचा निर्णय उलटला

शिवदीप लांडे यांनी एकाच वेळी दोन मतदारसंघांतून भाग्य आजमावण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या लोकप्रियतेमुळे विजयाची शक्यता वर्तवली जात असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर त्यांना पुरेसे जनाधार मिळाला नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत त्यांना अपयश स्वीकारावे लागले.

अकोल्याचा सुपुत्र, राजकीय घराण्याचा जावई

शिवदीप लांडे हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई असून, महाराष्ट्रातील त्यांची ओळखही प्रभावी आहे. तरीही बिहारातील राजकीय समीकरणे आणि स्थानिक संघटनाशक्तीसमोर त्यांची लोकप्रियता पुरेशी ठरली नाही.