जळगाव, सोलापूरच्या निवडणुका सुरू; मग अमरावतीतच स्थगिती का? संचालकांचा सवाल
Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) निवडणुकीला दुष्काळी परिस्थितीचे कारण देत राज्य शासनाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र, अमरावतीसह जळगाव आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अंतिम मतदार याद्या १४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्या असतानाही त्या दोन्ही बँकांच्या निवडणुका सुरू आहेत. मग अमरावती जिल्हा बँकेचीच निवडणूक प्रक्रिया का थांबविण्यात आली, असा सवाल विद्यमान संचालकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाविरोधात संचालक मंडळ न्यायालयात धाव घेणार असून, लवकरच याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दुष्काळाची परिस्थिती केवळ अमरावती जिल्ह्यापुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागांतही आहे. असे असताना जळगाव आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही बँकांचा निवडणूक कार्यक्रम २३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे, अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया मात्र स्थगित करण्यात आली आहे. शासनाच्या या वेगवेगळ्या भूमिकेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक जाणीवपूर्वक लांबणीवर टाकून बँकेवरील प्रशासकाचे नियंत्रण कायम ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का, असा आरोप काही संचालकांनी केला आहे. दुष्काळाचे कारण पुढे करून ऐनवेळी निवडणूक स्थगित केल्याने विद्यमान संचालकांसह निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक अंतिम टप्प्यात असताना स्थगिती
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली होती. नियमानुसार, मतदार यादी जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनंतर आणि वीस दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जातो. त्यानुसार निवडणुकीसाठी आवश्यक तयारीही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी निवडणूक स्थगित करण्याचे पत्र आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना ती थांबवून प्रशासकाची नियुक्ती करणे चुकीचे असल्याचा दावा संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे. या निर्णयामुळे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अचलपूरच्या विकासावरून कडू-तायडे यांच्यात जुंपली; भाजपच्या मुरली माकोडे यांचीही मैदानात उडी!
उच्च न्यायालयात दाद मागणार
निवडणूक स्थगितीच्या निर्णयाविरोधात संचालक मंडळाने कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या न्यायालयीन लढ्यामुळे अमरावती जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. आता न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे संचालकांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.








