BJP slogan win Mumbai Municipal Corporation criticizing Thackeray : ठाकरेंवर टीका करत भाजपचा मुंबई महापालिका जिंकण्याचा नारा
Mumbai : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयाने उत्साहाच्या भरात आलेल्या भाजपने आता थेट मुंबई महापालिका जिंकण्याचा नारा दिला आहे. “बिहारचा ट्रेलर संपला, आता मुंबई महापालिकेचा खरा पिक्चर सुरू होणार” अशा शब्दांत मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक रणशिंग फुंकत शिवसेना ठाकरे गटावर हल्ला चढवला.
अमित साटम म्हणाले की, “मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणारे, संपत्ती लुटणारे, मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे खरे डाकू आहेत. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईचे राज्य करणारे हे डाकूच आहेत.” नाव न घेता त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले.
बिहार विजयाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “विरोधक आम्ही जिंकलो तर लोकशाही, हरलो तर व्होटचोरी म्हणतात. बिहारने देशाचा पप्पू कोण ते सांगितलं राहुल गांधी. आता महाराष्ट्राचा पप्पू कोण, हे सांगण्याची गरज नाही. दोन महिन्यांत त्यालाही धडा शिकवू,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला.
साटम पुढे म्हणाले, “मुंबई महापालिका एखाद्या परिवाराची जहागीर नाही. बीएमसी तुमच्या घरातील राजकारणासाठी नाही. ही मुंबईची संपत्ती आहे. त्यावर डाका टाकणाऱ्यांना यावेळी मुंबईकर उत्तर देतील.”
“बिहार अनेक वर्षे बिमारू राज्य होतं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने विकास केला. बिहारचा विजय हा विरोधकांच्या रडारडीचा पराभव आहे. बिहार चुनाव तो ट्रेलर था… मुंबई महापालिका पिक्चर अभी बाकी है,” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील पुढील निवडणुकांचे संकेत दिले.
Local body election : शिंदे गटातील आमदार, खासदारांचा मोठा निर्णय !
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या चर्चेवरून साटम म्हणाले, “कोण कोणासोबत येतंय हे महत्वाचं नाही. गेल्या 11 वर्षांत मुंबईचा विकास कोणी केला हे महत्वाचं. बीडीडी चाळ पुनर्विकास, 550 स्क्वेअर फुटांचे घरे, मराठी भाषेला दिलेला दर्जा या गोष्टी आम्ही केल्या.”








