Dr. gauri palve suicide case family allegations rupali thombre reaction : रुपाली ठोंबरे यांचाही संताप म्हणाल्या त्या महिलेलाही आरोपी करा !
Mumbai : मुंबईतील वरळी येथे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अनंत गर्जे यांना अटक केली. दहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्यामध्ये तणाव असल्याची माहिती मिळत असून गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. गौरीच्या मृत्यूविषयी त्यांच्या आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत ननंद आणि दीरालाही अटक करण्याची मागणी केली आहे.
गौरी पालवे यांच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र देत म्हटले आहे की, “मी अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे या तिघांची नावं आरोप पत्रात दिली होती. पण सध्या फक्त अनंतला अटक झाली असून इतर दोन आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांनाही तत्काळ अटक करावी. तसेच हत्येच्या दिवशी बिल्डिंगमधील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचा पूर्ण दिवसाचा सीसीटीव्ही फुटेज मिळावे,” अशी मागणी त्यांनी केली.
Local body elections : अजित पवारांच्या टीकेला भाजप मंत्री मेघना बोर्डीकरांचा प्रतिहल्ला
२०२४ च्या फेब्रुवारीत अनंत आणि डॉ. गौरी यांचे लग्न झाले होते. विवाहाच्या अवघ्या दहा महिन्यांत गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना लग्नापूर्वीच माहिती देण्यात आली होती, असा दावा गर्जेच्या वकिलांनी न्यायालयात केला. “घटना घडली तेव्हा गौरी घरात एकट्याच होत्या आणि घर आतून बंद होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पुरावा नाही,” असा युक्तिवाद अनंतच्या वकिलांनी केला. मात्र सरकारी वकिलांनी “मूळ कागदपत्रे आणि आरोपांची शहानिशा आवश्यक असून ननंद-दीराचा शोध सुरू आहे,” असे सांगत कोठडीची मागणी केली. न्यायालयाने अनंत गर्जेची पोलिस कोठडी २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
Ram Mandir flag hoisting : अयोध्येत पुन्हा भगवा फडकला; आजचा दिवस अत्यंत अर्थपूर्ण !
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “एक घर उभं करू शकते ती महिला, पण अनैतिक संबंध ठेवून दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या महिलांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. गौरीच्या वडिलांचा आक्रोश पाहून मन सुन्न झालं. अनंत गर्जे, त्याची आई, नणंद यांच्यावर गुन्हा आहेच, पण त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असलेली महिला मोकाट राहू नये,” असे त्यांचे मत आहे. पुढे त्यांनी “भांडणं झाली, संकटं आली तरी आत्महत्या हा पर्याय कधीच नाही” असेही म्हटले.
Local body elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार
गौरीच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा तणाव पाहायला मिळाला. मोहोज देवढे (ता. पाथर्डी) येथे जेव्हा गौरीचे पार्थिव आणले गेले तेव्हा माहेरकडील लोकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली. सासरच्यांनी विरोध केल्याने दोन्ही बाजूंमध्ये चांगलाच वाद झाला. पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. अखेर घरापासून काही अंतरावर गौरीच्या अंत्ययात्रेला परवानगी देण्यात आली. यावेळी गौरीचे वडील हंबरडा फोडत म्हणाले, “तुम्हाला मुली असतील तर मला न्याय द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका, भपक्यावर जाऊ नका,” अशी हाक त्यांनी पोलिसांसमोर मारली.
या प्रकरणाचा तपास वरळी पोलिसांकडून सुरू असून अनंत गर्जेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. ननंद आणि दीराविरुद्धही तपास सुरू असून लवकरच पुढील कारवाई अपेक्षित आहे. गौरीची आत्महत्या की घातपात यातून काय निष्पन्न होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
____








