व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब

नावाचा वापर केल्याचा दावा, संजय राऊतांकडून चौकशीची मागणी

Mumbai मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्पोट केला आहे. आपल्या नावाचा वापर करून भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप जरांगे यांनी शिंदेंवर केला असून, या विधानामुळे महायुतीत आणि विशेषतः एकनाथ शिंदे गटाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

बीडमधील नारायणगडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना जरांगे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वीच्या एका कथित षडयंत्राचा पर्दाफाश केला. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्यानंतर आठ दिवसांनी आपल्याला एका भयंकर गोष्टीची माहिती मिळाली, असे सांगत जरांगे म्हणाले की, दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांसोबत कुजबूज सुरू होती की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांना जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत असे सांगून ते पैसे घेतले का असा सवाल करत जर आपण ५०० कोटी रुपये घेतले असतील तर ते सिद्ध करा, अन्यथा हे खोटं असेल तर एकनाथ शिंदे यांनी दिलखुलासपणे समोर येऊन सांगावं, असे थेट आव्हान जरांगे यांनी दिले. आपण आयुष्यात ५ हजार रुपयांचा गठ्ठाही पाहिलेला नाही, असे सांगत त्यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले.

आठ गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त!

एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आणि शिंदेंच्याच इशाऱ्यावर आंदोलन चालवल्याचा शिक्का बसलेले मनोज जरांगे आता पूर्णपणे आक्रमक होत शिंदे यांच्यावरच उलटले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून शिंद्यांनी मते घेतली, असा आरोप जरांगेंनी केला.

ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली, त्यांच्या पक्षाचे आमदार व खासदारही मराठा मतांमुळेच निवडून आले. मात्र, या उपकाराची परतफेड शिंद्यांनी मराठा समाजाची पाठीत खंजीर खुपसून आणि फसवणूक करून केली, असा प्रहारही त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी तातडीने उडी घेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाची सत्यता समोर आली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राऊतांनी घेतली आहे.

फुटीरतावादी आंदोलनावर भागवतांचा प्रहार,कॉक्रोचला सुनावले

दुसरीकडे, या सर्व घडामोडींवर शिवसेना पक्षातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जरांगेंनी या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे आव्हान देत जरांगे यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. एकेकाळी आरक्षणाच्या लढ्यात शिंदेंच्या जवळ मानले जाणारे जरांगे नावाचे अस्त्र आता थेट एकनाथ शिंदेंच्या विरोधातच तलवार उपसून उभे ठाकल्याने आगामी काळातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!