Mungantiwar gave a message of political friendship : बल्लारपूर येथे रेणुका दुधे यांच्या प्रचारसभेत विकासकामांची यादी मांडत काँग्रेसवर टीकेचा भडीमार
Ballarpur – Chandrapur : नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेणुका दुधे यांच्या प्रचारार्थ काल १ डिसेंबर रोजी झालेल्या जाहीर सभेत राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर तीव्र टीकेची झोड उठवली. महात्मा गांधी चौकातील काँग्रेसच्या सभेवर निशाणा साधत ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांकडे विकासाचा एकही मुद्दा नव्हता. तरीही त्यांच्या आमदारांनी लांबलचक भाषण ठोकले. स्वतःच्या मतदारसंघात एकही विकासकाम नसताना मोठमोठे डायलॉग मारणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे, असे ते म्हणाले.
भाजपने केलेल्या कामांची आठवण करून देताना त्यांनी ठामपणे सांगितले की, आम्ही राजकारण दावावर लावले, पण बल्लारपूरला तहसील बनवले. आज येथे ग्रामीण रुग्णालय, एसडीओ कार्यालय, आधुनिक नगरपरिषद इमारत, एअरपोर्टसारखे बसस्थानक, पोलीस स्टेशन,बॉटनीकल गार्डन, स्मार्ट आयटीआय अशी असंख्य कामे उभी आहेत. हेच आमचा विकासाचे रिपोर्ट कार्ड आहे.
काँग्रेसवाले म्हणतात मत चोरी झाली. मत चोरी नाही, तर त्यांच्या मेंदूचीच चोरी झालेली आहे. जनतेची कामे करणार नाहीत आणि आरोप मात्र आमच्यावर करतील, असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर तिखट हल्ला चढवला.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूर जनतेने दिलेले प्रेम मी सेवेतून फेडणार..!
काँग्रेस नेते म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवणाऱ्यांसारखे आहेत, या मुनगंटीवारांच्या उपरोधिक टोलेबाजीतून जमलेल्या जनतेमध्ये हशा आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. काँग्रेसच्या विधानसभेतील भूमिकेवरही त्यांनी जोरदार प्रहार केला. काँग्रेस नेते म्हणतात की, लाडक्या बहीणींना पैसे देऊ नका. का नाही द्यायचे? त्यांच्या बापाचा पैसा आहे का? जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या निर्णयांवरही ते अडथळे का आणतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर इतिहासाची आठवण करून देत आमदार मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे पापही जनतेपुढे मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९५२ मध्ये निवडणुकीत पाडण्याचा काम काँग्रेसनेच केले होते. आजही त्यांचेच अनुयायी जनतेच्या हक्कांवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सभेत रेणुका दुधे यांच्या विजयाची आवश्यकता अधोरेखित करत ते म्हणाले, दुधेंना निवडून दिल्यावर बल्लारपूरची प्रगती निश्चित होईल.
Election Commission : यशोमती ठाकूरांचा सरकार, आयोगावर थेट आरोप; म्हणाल्या ‘तो’ निर्णय मनमानी !
राजकीय दोस्तीबाबत बोलताना मुनगंटीवारांनी खास शैलीत संदेश दिला. आम्ही दोस्ती यारी निभावणारे लोक आहोत. म्हणूनच रामदास आठवले यांचा एकही आमदार-खासदार नसतानाही ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या खांद्याला खांदा लावून मंत्री म्हणून काम करत आहेत. यावेळी त्यांनी ‘यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी’ या गाण्याच्या ओळी गायल्याने सभेच्या वातावरणात रंगत भरली. बल्लारपूरमधील या सभेने निवडणूक वातावरण अधिक तापवले असून, मुनगंटीवारांच्या आक्रमक भाषणाने काँग्रेसवर जोरदार दबाव निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.








