Delay in vote counting; candidates left waiting for 18 days : प्रशासनाच्या तयारीवरही ‘पाणी’, २१ डिसेंबरपर्यंत प्रतिक्षा
Amravati जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता होणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ऐनवेळी घेतलेल्या निर्णयानुसार मतमोजणीची प्रक्रिया आता २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनासह उमेदवारांनी केलेल्या विस्तृत तयारीवर अक्षरशः ‘पाणी’ फेरल्याचे चित्र आहे. परिणामी उमेदवारांचे जवळपास १८ दिवस ‘देव पाण्यात’ आणि ‘जीव टांगणीला’ राहणार आहेत.
नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मतमोजणी लांबणीवर गेल्याने आधीच तणावाखाली असलेल्या उमेदवारांची धडपड आणखी वाढली आहे. मूळ नियोजनानुसार निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार होते. परंतु आता २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Balwant Wankhede : रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावावर खासदार बळवंत वानखडे आक्रमक
नऊ नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान संपन्न झाले. त्यानंतर अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेसह इतर पालिकांतील सहा सदस्यपदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतमोजण्या एकाच दिवशी—२१ डिसेंबरला—होणार असल्याने, मंगळवारी मतदान केलेल्या उमेदवारांना विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल १८ दिवस थांबावे लागणार आहे.
स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या मतदान यंत्रांसाठी पोलिस व अन्य सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त तब्बल २० दिवस ठेवावा लागणार आहे. साधारणपणे ‘स्थानिक’ निवडणुकीत मतमोजणीपर्यंत दोन-तीन दिवसांचा पहारा पुरेसा ठरतो; मात्र यावेळी मुदत वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवरही अतिरिक्त भार पडणार आहे. निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील या काळात अधिक जबाबदाऱ्या निभवाव्या लागणार आहेत.
मतदानापासून निकाल जाहीर होईपर्यंतचा कालावधी वाढल्याने उमेदवारांची धडपड अधिक तीव्र झाली आहे. दररोज समर्थकांकडून, “आपण आघाडीवर आहोत ना?” असे प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियावरील विविध अफवा, अनौपचारिक माहिती आणि चर्चांमुळे उमेदवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Local Body Elections : मतदार यादीतील घोळ सात दिवसात सावरणार?
मतदानानंतर बूथनिहाय मतदानाचे अंदाज, कोणत्या भागात कोणत्या उमेदवाराला जास्त मते मिळाली असतील, कोणती स्थानिक समीकरणे कशी कलाटणी घेऊ शकतात—याबाबत उमेदवारांकडून सतत ‘आकडेमोड’ सुरु आहे. पुढील १८ दिवस हा मानसिक ताण आणखी वाढवणारे ठरणार आहेत.








