Opposition boycotts tea party and attacks : विरोधकांचा चहापानाचा बहिष्कार आणि हल्लाबोल
Nagpur : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेनुसार सरकारने विरोधकांना चहापानासाठी आमंत्रण दिले. पण यावेळीही विरोधकांनी चहाचा कप हातात न घेता थेट हल्ल्याची भाषा निवडली आणि चहापानावर बहिष्कार टाकला. नागपूरमधील संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकेचा मारा केला.
वडेट्टीवार म्हणाले, “दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. ही संविधानिक पदे जाणूनबुजून रिक्त ठेवली आहेत. आणि त्याच सरकारने विरोधकांना चहापानाला बोलवायचे? संविधानावर विश्वास नाही आणि चहावर विश्वास ठेवू म्हणतात! त्यामुळे बहिष्काराशिवाय पर्याय नव्हता.”
सरकारच्या अपयशाची “कुंडली”च पुढे मांडत वडेट्टीवारांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उचलला. “दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जमाफी देऊ देऊ म्हणत तारीख पे तारीख देतात. देशभरात 2014 पासून एक लाख 12 हजार शेतकरी आत्महत्या आणि त्यातील तब्बल 38.5 टक्के महाराष्ट्रातील. हे सरकारला भूषणावह वाटते का?” असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
Winter Session : निवडणुकीची धामधूम, राजकीय कटुतेच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन
कापसावरील आयात कर 11 टक्क्यांवरून 0 केल्याने शेतकरी संकटात लोटले गेले असे सांगत वडेट्टीवारांनी आरोपांची यादी सादर केली. “तिघेही मिळून सरकार चालवताहेत की तिघेही मिळून भांडताहेत? शेतकऱ्यांकडे लक्षच नाही. केंद्र म्हणतं प्रस्ताव नाही आला, राज्य म्हणतं पाठवला. म्हणजे मदतीचा प्रस्ताव कुंडलीत हरवला का?”
यावरच थांबता वडेट्टीवारांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवरही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला “राज्याची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली आहे. नऊ लाख 32 हजार कोटींचे कर्ज राज्यावर आले. राज्याच्या उत्पन्नातील 22 टक्के हिस्सा कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो. निधी वाटपात प्रचंड भेदभाव आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीकडे चाललाय.”
Marathi vs Marwari : मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला: जैन मुनींच्या वक्तव्यामुळे खळबळ
महिला सुरक्षेवर सरकारने लाडकी बहीण योजना कितीही कौतुकाने मिरवली तरी वास्तव वेगळे असल्याचा आरोपही त्यांनी केला. “2021 ते 2025 दरम्यान लहान मुलींवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे झाले. दररोज 24 अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांची नोंद होत आहे. हे लाडक्या बहिणींचे रक्षण आहे का?” असा सवाल वडेट्टीवारांनी सरकारवर तडकावला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कोर्टाने पोलिसांवर बोट ठेवूनही कारवाई नाही यावरून सरकार पोलिसांना पाठीशी घालत असल्याचेही ते म्हणाले. “अशा सरकारच्या चहापानाला जाण्याचे औचित्यच नाही.” असेही ते म्हणाले.








