Opposition boycotts tea party in Nagpur starting tomorrow : उद्यापासून नागपुरात प्रारंभ, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Nagpur: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी नागपूरमध्ये सुरू होत असून राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अलीकडील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेल्या कटुतेनंतर होणाऱ्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परस्पर समन्वय किती दृढ राहील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सरकारला विरोधकांचा थेट सामना करावा लागणार असून दोन्ही सभागृहांत सध्या विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी ताकदीने एकत्र येत सरकारला कोपरखळी देण्याची तयारी दाखवली आहे.
Marathi vs Marwari : मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला: जैन मुनींच्या वक्तव्यामुळे खळबळ
अधिवेशनात शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत जाहीर केली असली तरी विरोधक त्यावर समाधानी नाहीत. कापूस आणि सोयाबीनला मिळणारा तुलनेने अल्प भाव, बाजारात कथितरीत्या केलेली कृत्रिम भाव कपात, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात झालेला विलंब, या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. शासनाच्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा घेऊन सत्ता पक्षाच्या बैठकीवर विरोधक दबाव निर्माण करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
या अधिवेशनावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची छाप पडणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका समीप असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष सभागृहातील चर्चांना भावी निवडणुकांच्या समीकरणांसोबत जोडून पाहत आहे.
प्रत्येक मुद्द्यावरून सरकारी आणि विरोधी बाकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता असून अधिवेशनाच्या चर्चेत स्थानिक राजकारण, सामाजिक प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती अपेक्षित आहे. अधिवेशनात एकूण ११ विधेयके मांडली जाणार असून त्यापैकी सहा अध्यादेश तर पाच नवीन विधेयके असतील. पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या राज्य सरकारकडून सभागृहात मांडल्या जाणार आहेत.
Tapovan tree cutting : तपोवन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी हालचाल
सरकारला अडचणीत आणण्याच्या रणनीतीसाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा बहिष्कार हा विरोधकांचा राजकीय संदेश असल्याचे मानले जात असून सरकारविरोधात आक्रमक पवित्रा राखण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय शिरसाठ आणि इतर मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेही अधिवेशनात सरकारवर हल्ला चढवण्याची विरोधकांची तयारी आहे. अल्प कालावधीचे असले तरी चर्चेचा आणि संघर्षाचा झंझावात निर्माण करत हे अधिवेशन राज्याच्या राजकीय वातावरणावर मोठा प्रभाव टाकणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
__








