Prahar Shikshak Sanghatna : विषय शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरा; प्रहार शिक्षक संघटनेचा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव

Demand raised to fill subject teacher vacancies immediately : ऑनलाईन कामांचा बोजा, सुविधा शून्य शाळा; समस्या निवारण सभेत मागण्यांचा पाऊस

Shegao शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक प्रलंबित प्रशासकीय प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने १२ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव आणि वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या विषय शिक्षकांच्या पदांवरून संघटनेने प्रशासनाला जाब विचारला.

सभेत प्रामुख्याने शालेय ऑनलाईन कामांचा प्रचंड ताण शिक्षकांवर टाकला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. युडायस प्लस पोर्टल, अपार आयडी, शालेय गुणवत्ता मूल्यांकन, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, पॅट परीक्षा गुण, शालेय पोषण आहार, उपस्थिती, विविध शासकीय उपक्रमांची माहिती व फोटो अपलोड अशा असंख्य ऑनलाईन कामांचा भडिमार सुरू असताना अनेक शाळांमध्ये इंटरनेट वाय-फाय सुविधा नसल्याची गंभीर बाब मांडण्यात आली. त्यामुळे प्रत्येक शाळेला इंटरनेट सुविधा व शिक्षकांना अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

BJP Akola : पक्षविरोधी कारवायांना भाजपची चपराक; बंडखोरांना माफी नाही

यासोबतच अनेक वर्षांपासून गणित व विज्ञान विषय शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. ही रिक्त पदे तातडीने भरण्याची ठाम मागणी संघटनेने केली. तसेच चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव, सेवापुस्तके अद्यावत करण्यासाठी कॅम्पचे आयोजन, भविष्य निर्वाह निधीतील तफावती दुरुस्ती, बूथ लेव्हल ऑफिसरची कामे त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याची मागणीही करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता इयत्ता पाचवी व आठवी तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेची फी अल्प दरात आकारावी, अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली.

Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी

या सर्व मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी मो. सलीम पिर मोहम्मद यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे, शेगाव तालुकाध्यक्ष सुनील घावट, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष अजिंक्य रिंढे, संग्रामपूर तालुकाध्यक्ष मिलिंद इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप बळी, तालुका कार्याध्यक्ष सचिन वडाळ, सरचिटणीस विजय टापरे, अनिल खेडकर, चिटणीस श्रीकृष्ण न्याहाटकर यांच्यासह शिक्षकांनी सादर केले.