Congress defeated by Shinde Sena’s strategy : बुलढाणा पालिकेत शह–काटशहाचे राजकारण, भाजप उमेदवाराची अनामत जप्त
Buldhana प्रारंभापासूनच वादग्रस्त आणि चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या अचूक राजकीय रणनीतीने काँग्रेसचा पराभव झाला, तर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची अनामत जप्त होण्याची नामुष्की ओढावली. मतमोजणीनंतर हे राजकीय चित्र स्पष्ट झाले.
या निवडणुकीत शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यात शह–काटशहाचे राजकारण रंगले. या संघर्षात काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा ठेवत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सक्रिय भूमिका घेतली होती. मात्र, निर्णायक टप्प्यावर भाजपमधील एक गट तटस्थ राहिल्याने, तर दुसरीकडे शिंदेसेनेविरोधात काँग्रेससह भाजपचे काही स्थानिक नेते एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.
Local Body Elections : नेतृत्वाची कसोटी, भाजपची सरशी; नियोजनाचा विजय
साम, दाम, दंड आणि भेद या पारंपरिक राजकीय नीतींचा प्रभावी वापर करत आमदार संजय गायकवाड यांनी प्रभागरचनेनुसार योग्य उमेदवारांची निवड करून पालिकेच्या राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिंदेसेनेने सर्व जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने आघाडी करून लढत दिली. भाजपनेही स्थानिक समीकरणांचा विचार करून काही जागांवर उमेदवार उतरवले; मात्र शिंदेसेनेच्या डावपेचामुळे भाजपची रणनीती अपयशी ठरली.
या निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, भाजपचे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांच्या पत्नी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) चे शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांचा पराभव झाला. त्यामुळे तीनही प्रमुख पक्षांच्या नेतृत्वाला बुलढाणा पालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते. शिंदेसेनेतर्फे पूजा गायकवाड, काँग्रेसकडून लक्ष्मी काकस, भाजपकडून अर्पिता शिंदे यांच्यासह अन्य चार उमेदवार निवडणुकीत होते.
Local Body Elections : आजी–माजी आमदारांना मतदारांचा समसमान कौल!
एकूण ३७,३९६ वैध मतांपैकी पूजा गायकवाड यांनी १८,५२५ मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मी काकस यांना १३,७४५ मते मिळाली. भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकासाठी आवश्यक असलेल्या ४,६७५ मतांपेक्षा ५२६ मते कमी मिळाल्याने त्यांची अनामत जप्त झाली. एकूणच या निवडणुकीत पाच उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.








